लंडन UK Glasgow Gurdwara Row : स्कॉटलंडमधील ग्लासगो येथील गुरुद्वारात लंडनमधील भारतीय राजदूत विक्रम दोराईस्वामी यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तनाच्या घटनेचा अनेक स्तरातून निषेध केला जातोय. ग्लासगो गुरुद्वारानेही या घटनेचा तीव्र निषेध केलाय. युनायटेड किंगडममधील भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांना शनिवारी धार्मिक स्थळी नियोजित पद्धतीनं गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आलं. एका पूर्वनियोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भारतीय राजदूत तिथे गेले होते.
अज्ञातांनी गुरुद्वारात जाण्यापासून रोखलं :गुरूद्वारा व्यवस्थापन समितीनं ग्लासगो गुरुद्वाराबाहेर अज्ञात व्यक्तींनी केलेल्या या वर्तनाला 'अपमानजनक घटना' म्हटले आहे. त्यांनी प्रसिद्धपत्रकात म्हटलंय की, गुरुद्वारा सर्व समुदाय आणि पार्श्वभूमीच्या लोकांसाठी खुला आहे. ग्लासगो गुरुद्वारामध्ये 29 सप्टेंबर 2023 रोजी भारतीय उच्चायुक्त वैयक्तिक भेटीवर आले होते. याचे निमंत्रण त्यांना स्कॉटिश संसदेच्या सदस्यानं दिलं होतं. ग्लासगो परिसरात बाहेरून आलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या ताफ्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. तसंच त्यांना गुरुद्वारात जाण्यापासून रोखण्यात आलं. त्यानंतर ते आणि त्यांची टीम येथून परतल्याचं निवेदनात म्हटलंय. तसंच अज्ञात व्यक्तींच्या या टोळक्यानं परिसरातील लोकांनाही त्रास दिला. या घटनेची माहिती स्कॉटलंड पोलिसांनाही देण्यात आल्याचं ग्लासगो गुरुद्वारा गुरु ग्रंथ साहिब शीख सभेनं आपल्या निवेदनात सांगितलंय. या घटनेची संपूर्ण परिस्थिती समजून घेण्यासाठी तपास केला जात असल्याचं स्कॉटलंड पोलीसांनी सांगितलंय. भारतीय उच्चायुक्तांनीही या घटनेची माहिती माध्यमांना दिली.