वॉशिंग्टन - भारतीय वंशाचे अमेरिकन अंतराळवीर राजा चारी यांना अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी हवाई दलाचे ब्रिगेडीयर जनरल म्हणून नामांकीत केले आहे. त्यांच्या नामांकनाची घोषणा गुरुवारी करण्यात आली. राजा चारी सध्या कर्नल पदावर कमांडर तथा अंतराळवीर म्हणून नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन, जॉन्सन स्पेस सेंटर टेक्सास येथे कार्यरत आहेत. त्यांना ब्रिगेडीयर जनरल म्हणून नामांकीत केल्याने आणखी एका भारतीयाने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची ओळख निर्माण केली आहे.
मिलवॉकीमध्ये झाला राजा चारी यांचा जन्म :राजा चारी यांचे वडील श्रीनिवास चारी हे हैदराबादवरुन अमेरिकेत आपले इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर त्यांनी जॉन डीयर या कंपनीत वॉटरलू येथे नोकरीनिमित्त स्थाईक झाले. त्यानंतर त्यांनी तेथेच लग्न केले. अमेरिकेतील मिलवॉकीमध्ये राजा चारी यांचा जन्म झाला. त्यांचे पूर्ण नाव राजा जॉन वुर्पुतूर चारी असे आहे. राजा चारी यांनी आयोवा येथील सीडर फॉल्स शहरातून सुरुवातीचे शिक्षण घेतले.
कोलंबस हायस्कूलमधून केले शिक्षण पूर्ण :राजा चारी यांनी आपले प्राथमिक शिक्षण वॉटरलू आयोवा येथील हायस्कूलमधून आपली पदवी पूर्ण केली आहे. त्यानंतर त्यांनी कोलोरॅडो येथील अमेरिकेच्या एअर फोर्स अकादमीमधून अॅस्ट्रोनॉटिकल अभियांत्रिकीमध्ये पदवी आणि मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून एरोनॉटिक्स आणि अॅस्ट्रोनॉटिक्समध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी पॅटक्सेंट मेरीलँड येथील यूएस नेव्हलमध्ये टेस्ट पायलट स्कूलमधून पदवी प्राप्त केली. त्यासह त्यांनी कॅन्सस येथील यूएस आर्मी कमांड अँड जनरल स्टाफ कॉलेजमधूनही पदवी मिळवली आहे.