हैदराबाद Pakistan Iran Conflict :इराणच्या सरकारी मीडियानुसार, इराणनं मंगळवारी (16 जानेवारी) पाकिस्तानमधील जिहादी गटावर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं हल्ला केला. गाझामधील पॅलेस्टाईन-इस्रायल युद्धादरम्यान इराणनं पाकिस्तानवर केलेल्या या हवाई हल्ल्यानं संपूर्ण पश्चिम आशियात तणावाची नवी परिस्थिती उत्पन्न झाली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं या हल्ल्याचा निषेध केलाय. इराणनं 'कोणत्याही कारणाशिवाय' पाकिस्तानी हवाई हद्दीचं उल्लंघन केल्याचं मंत्रालयानं म्हटलं. या हल्ल्यात दोन मुलं ठार आणि तीन जण जखमी झाल्याचं पाकिस्तानं सांगितलं आहे.
इराणनं हल्ला का केला : आपल्या काही अधिकारी आणि सहकाऱ्यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराणनं सोमवारी सीरिया आणि इराकमधील दहशतवादी तळावर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले होते. गाझा युद्धाला प्रत्युत्तर म्हणून, इराण इस्राईल आणि अमेरिकेशी अप्रत्यक्ष संघर्ष करत आहे. मात्र इराणचं म्हणणं आहे की ते आपल्या प्रादेशिक मित्र देशांविरुद्धच्या हल्ल्यांपासून आणि देशांतर्गत संघर्षापासून स्वतःचा बचाव करत आहेत. या महिन्यात, इराणच्या केरमन शहरात इस्लामिक स्टेट गटाच्या शाखेनं केलेल्या बॉम्बस्फोटात सुमारे 100 लोक मारले गेले होते.
पाकिस्तान, इराण आणि सौदी अरेबिया : पाकिस्तान आणि इराणमधील सामायिक सुरक्षा चिंता दोन्ही देशांमधील तणावाला कारणीभूत आहे. दोन्ही देश दहशतवाद आणि अतिरेक्यांशी लढण्यात स्वारस्य दाखवतात, पण त्यांनाही मर्यादा आहेत. पाकिस्तान हा सुन्नी बहुसंख्य देश आहे तर इराणमध्ये शिया मुस्लिमांची संख्या जास्त आहे. तथापि, गेल्या 70 वर्षांत, पाकिस्तान आणि इराणमध्ये वाणिज्य, ऊर्जा आणि पायाभूत सुविधा तसंच प्रादेशिक स्थैर्यासाठी अनेक प्रयत्न झालेत. मात्र इराण आणि सौदी अरेबिया यांच्यातील संघर्षामुळे हे संबंध कधीच फुलले नाहीत. पाकिस्तान हा बहुतांशी सौदी अरेबियाच्या राजनैतिक प्रभावाखाली असतो हे सर्वज्ञात आहे.
अमेरिकेचा प्रभाव : इराण आणि सौदी अरेबियामध्ये या प्रदेशातील प्रभावावरून संघर्ष सुरू झाला. याव्यतिरिक्त, दोन देशांमध्ये लक्षणीय धार्मिक फरक आहेत. ज्यामुळे कधीकधी संघर्ष टोकाल पोहोचतो. याचा फटका पाकिस्तानलाही बसला आहे. पाकिस्तान आणि इराणमधील संबंध आणखी एका मोठ्या जागतिक शक्तीच्या निर्णयामुळे प्रभावित झाले, ती म्हणजे अमेरिका.
इराण आण्विक करार : उदाहरण म्हणून, तुम्ही संयुक्त व्यापक कृती योजना (JCPOA) घेऊ शकता, ज्याला इराण आण्विक करार देखील म्हणतात. इराण आण्विक करार हा इराण आणि P5+1 (युनायटेड नेशन्स सुरक्षा परिषदेचे पाच स्थायी सदस्य—युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम, रशिया, फ्रान्स आणि चीन अधिक जर्मनी) यांच्यात जुलै 2015 मध्ये झालेला करार आहे. आर्थिक निर्बंध उठवण्याच्या बदल्यात इराणचा आण्विक कार्यक्रम मर्यादित करून अण्वस्त्रं विकसित करण्यापासून रोखण्यासाठी हा करार करण्यात आला होता. मात्र 2018 मध्ये अमेरिकेने या करारातून एकतर्फी माघार घेतली. यामुळे इराण आणि पाश्चिमात्य देशांमधील तणाव वाढला असून त्याचा पाकिस्तान-इराण संबंधांवर नकारात्मक परिणाम झाला आहे. कारण पाकिस्तान आपल्या गरजांसाठी मोठ्या प्रमाणावर अमेरिकेवर अवलंबून आहे.
शब्द आणि कृतीमध्ये फरक : खरे तर शब्द आणि कृतीमधील फरक ही दोन्ही देशांमधील संबंधांची मोठी अडचण आहे. पत्रकार परिषदा आणि राजनयिक विधानांमध्ये, पाकिस्तान आणि इराण दहशतवाद, कट्टरतावाद आणि अफगाणिस्तानमधील अस्थिर परिस्थितीबद्दल समान चिंता व्यक्त करतात. मात्र, जेव्हा जेव्हा या सुरक्षा समस्यांना तोंड देण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान समन्वय आणि गुप्तचर सामायिकरणाचा विषय येतो, तेव्हा दोन्ही देश एकमेकांसाठी फारसं काही करत असल्याचं दिसत नाहीत.