चंदीगड :अमेरिकेच्या न्यूयॉर्क पोलीस विभागाने एका शीख सैनिकाला दाढी वाढवण्यास मज्जाव केल्यानंतर शीख संघटना आक्रमक झाल्या आहेत. शीख संघटनांकडून या निर्णयाचा निषेध करण्यात येत आहे. या प्रकरणी श्री अकाल तख्त साहिबचे जथेदार ग्यानी रघबीर सिंग यांनी जोरदार टीका केली आहे. 'अमेरिकेच्या सर्वांगीण विकासात शीखांचे योगदान दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही. भारत सरकारने याबाबत लवकरात लवकर काहीतरी पावले उचलावीत, असे ते म्हणाले आहेत. (Ban Sikh From Growing Beard).
जथेदार ग्यानी रघबीर सिंग यांचे परराष्ट्र मंत्रालयाला आवाहन :फार पूर्वी शीखांनी यूएस आर्मी आणि सिव्हिल सर्व्हिस सेक्टरमध्ये सेवा करण्यासाठी दीर्घ कायदेशीर लढाई जिंकली होती. त्यानंतर शिखांना अमेरिकेत प्रत्येत क्षेत्रात धार्मिक स्वातंत्र्य देण्यात आले होते. परंतु आता न्यूयॉर्क पोलीस विभागाने एका शीख सैनिकाला दाढी ठेवण्यास बंदी घातल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. 'परराष्ट्र मंत्रालयाने या संदर्भात अमेरिकन पोलिसांशी बोलायला हवे जेणेकरुन शिखांना त्यांचे अधिकारी परत मिळू शकतील', असे ग्यानी रघबीर सिंग म्हणाले आहेत.