काठमांडू (नेपाळ) Nepal Earthquake : शनिवारी झालेल्या विनाशकारी भूकंपातून नेपाळ सावरलाही नव्हता. तोच रविवारी पहाटे पुन्हा एकदा नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. सुदैवानं त्याची तीव्रता कमी होती. या भूकंपामुळे जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, शुक्रवारी रात्री झालेल्या भूकंपाच्या धक्क्याला नेपाळ अजूनही सामोरे जात आहे. त्या भूकंपात 157 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
भूकंपाचे धक्के सुरुच : हिमालयातील राष्ट्राला आज पहाटे 3.6 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनं सांगितलं की, पहाटे 4:38 वाजता भूकंप झाला. त्याचं केंद्र नेपाळची राजधानी काठमांडूपासून 169 किमी उत्तर-पश्चिमेस जमिनीपासून 10 किमी खोलीवर होते. यापूर्वी 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. यानंतर, शनिवारी दुपारी 3.3 तीव्रतेचे अतिरिक्त धक्के बसले, ज्यामुळं बाधित लोकसंख्येसमोरील आव्हानं आणखी वाढली आहेत.
मोठ्या प्रमाणात नुकसान पंतप्रधानांची कबूली : नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती दिली. त्यांनी भूकंपग्रस्त भागांना भेट देत परिस्थितीची पाहणी केली. सरकारनं हेलिकॉप्टरद्वारे बचाव कार्य करण्यासाठी नेपाळ आर्मी, नेपाळी गार्ड आणि सशस्त्र पोलिस दल तैनात केलंय. आरोग्य कर्मचारीही तैनात केले जात आहेत. हे अत्यावश्यक वैद्यकीय साहित्याने सुसज्ज आहेत. भूकंपग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेकडो लोक जखमी झाले आहेत. हजारो घरे उद्ध्वस्त झाली असून सरकार मदतकार्यात गुंतलं असल्याचंही नेपाळच्या पंतप्रधानांनी सांगितलं.
24 तासांपुर्वी झाला होता विनाशकारी भूंकप : नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. या भूकंपात आतापर्यंत 157 जणांचा मृत्यू झालाय, तर 160 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. यात शेकडो घरांचं नुकसान झालंय. यावरून भूकंपाची तीव्रता किती आहे, याचा अंदाज लावता येतो. 2015 नंतर नेपाळमधील हा सर्वात विनाशकारी भूकंप असल्याचं बोललं जातंय. या भूकंपाचे धक्के भारतातही मोठ्या प्रमाणात जाणवले होते. दिल्ली, दिल्ली-एनसीआरसह उत्तर प्रदेश व बिहारमधील अनेक जिल्ह्यात या भूकंपाचे धक्के जाणवले होते.
हेही वाचा :
- Nepal Earthquake : शक्तिशाली भूकंपानं नेपाळमध्ये हाहाकार! 132 जणांचा मृत्यू; भारतातही जाणवले जोरदार धक्के
- Earthquake in Uttarakhand : 6 महिन्यांत 10 व्या भूकंपानं हादरलं उत्तराखंड; सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही
- Afghanistan Earthquake : भूकंपाच्या धक्क्यानं अफगाणिस्तान हादरलं; 320 नागरिकांचा मृत्यू