नवी दिल्ली Maldives President Mohamed Muizzu : मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू पाच दिवसांच्या चीन दौऱ्यानंतर मायदेशी परतले. मालदीवमध्ये परतताच त्यांनी आपले इरादे स्पष्ट केले आहेत. "आम्ही लहान असलो तरी आमच्यावर दादागिरी करण्याचा परवाना कोणाकडेही नाही", असं ते म्हणाले. मुइज्जू यांनी कोणाचंही नाव न घेता हे वक्तव्य केलं. मात्र त्यांचं लक्ष्य भारताकडे असल्याचं मानलं जात आहे.
शी जिनपिंग यांची भेट घेतली : चीन समर्थक मानल्या जाणाऱ्या मुइज्जू यांनी पाच दिवसांच्या चीन दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. मालदीव सरकारच्या तीन मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल निलंबित करण्यात आलं असताना त्यांचा दौरा झाला. या मुद्द्यावरून सध्या भारत आणि मालदीवमध्ये राजनैतिक तणावाचं वातावरण आहे.
चिनी पर्यटक पाठवण्याचं आवाहन : भारतात मालदीववर बहिष्कार घालण्याचा ट्रेंड सुरू झाल्यानंतर मुइज्जू यांनी चीनला मालदीवमध्ये अधिकाधिक चिनी पर्यटक पाठवण्याचं आवाहन केलं आहे. मालदीव बिझनेस फोरमला संबोधित करताना मुइज्जू यांनी हे वक्तव्य केलं. "कोविडपूर्वी आमच्या देशात येणारे बहुतेक पर्यटक चीनचे होते. मी विनंती करतो की चीननं यासाठी पुन्हा प्रयत्न तीव्र करावेत", असं मुइज्जू म्हणाले.
भारतविरोधी भूमिका : मालदीवचे नवे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू हे त्यांच्या भारतविरोधी भूमिकेसाठी ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात सुमारे 75 भारतीय सैनिकांची तुकडी काढून टाकण्याचं वचन दिलं होतं. भारतीय सैन्य मागे घेण्याबाबत चर्चा करण्यासाठी भारत आणि मालदीव यांनी एक कोअर ग्रुप तयार केला आहे. 'इंडिया आउट' असा मुइज्जू यांचा नारा होता. तसेच मालदीवच्या 'इंडिया फर्स्ट पॉलिसी'मध्ये बदल करण्याबाबतही ते बोलले आहेत.
हे वाचलंत का :
- 'या' कारणामुळे चीनशी संबंध सामान्य होणं अशक्य, सीमा प्रश्नावर जयशंकर यांची भूमिका काय?
- तैवानमध्ये कट्टर चीन विरोधक लाय चिंग ते यांनी जिंकली राष्ट्रपतीपदाची निवडणूक
- मोदींची एक पोस्ट अन् सगळीकडे लक्षद्वीपचीच हवा! मार्चपर्यंतची सर्व तिकिटं बुक