ओटावा :कॅनडात खलिस्तान समर्थकांचा हिंसाचार थांबत नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार, खलिस्तान समर्थकांनी शनिवारी रात्री पुन्हा एकदा कॅनडातील एका हिंदू मंदिराला लक्ष्य केले. ऑस्ट्रेलिया टुडेच्या वृत्तानुसार, शनिवारी रात्री उशिरा खलिस्तान समर्थक खलिस्तानी सार्वमताचे पोस्टर घेऊन हिंदू मंदिरात पोहोचले आणि त्यांनी तेथे तोडफोड केली. वृत्तानुसार ही घटना कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतात घडली आहे.
घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल : ऑस्ट्रेलिया टुडेने ट्विटरवर म्हटले आहे की, खलिस्तानी अतिरेक्यांनी कॅनडातील आणखी एका हिंदू मंदिराची तोडफोड केली. त्यांनी भारतीय समुदायामध्ये भीती निर्माण करण्यासाठी मंदिराच्या द्वारावर खलिस्तान सार्वमताचे पोस्टर्स चिकटवले. या पोस्टर्समध्ये लिहिले आहे की, १८ जूनच्या हत्येमध्ये कॅनडा भारताच्या भूमिकेची चौकशी करत आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दोन मुखवटा घातलेले पुरुष पोस्टर चिकटवताना आणि घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी फोटो काढताना दिसत आहेत. मंदिराच्या गेटवरील पोस्टरमध्ये खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख आणि दहशतवादी हरदीप सिंग निज्जरचा फोटो दिसतो आहे. या वर्षी जूनमध्ये हरदीप सिंग निज्जरची हत्या झाली होती.