जेरुसलेम Indian origin killed in Hamas attack : इस्रायलच्या दक्षिण भागात 7 ऑक्टोबर रोजी हमासनंकेलेल्या भीषण हल्ल्यात भारतीय वंशाच्या दोन इस्रायली महिला सुरक्षा अधिकारी ठार झाल्या आहेत. अधिकृत सूत्रांनी आणि भारतीय समुदायातील लोकांनी रविवारी याला दुजोरा दिलाय. अधिकृत सूत्रांनी सांगितलं की, 22 वर्षीय लेफ्टनंट ऑर मोसेस, अश्दोदच्या होम फ्रंट कमांडची कमांडर आणि पोलिसांच्या सेंट्रल डिस्ट्रिक्टची सीमा पोलीस अधिकारी इन्स्पेक्टर किम डोकरकर 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या हल्ल्यात ठार झाल्या आहेत. या दोन्ही महिला अधिकाऱ्यांचा युद्धात लढताना मृत्यू झाल्याचं बोललं जातय.
तरुणीनं सांगितली आपबीती : सैन्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, युद्धात आतापर्यंत 286 जवान आणि 51 पोलीस अधिकारी शहीद झाले आहेत. ही संख्या वाढू शकते. कारण इस्रायलकडून मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. हरवलेल्या किंवा अपहरण केलेल्या लोकांचा शोध घेण्यात येत आहे. या हल्ल्यात शहाफ टॉकर ही 24 वर्षीय महिला तिच्या मैत्रिणीसह थोडक्यात बचावली होती. तीनं वाचल्यानंतर तिची आपबीती सांगितली. शहाफचे आजोबा याकोव्ह 1963 मध्ये वयाच्या 11 व्या वर्षी मुंबईतून इस्रायलमध्ये स्थायिक झाले. त्यांनी सांगितलं की त्यांची नात अजूनही धक्क्यामध्ये आहे. मानसिक वेदनांमुळे ती बोलू शकत नाही. याकोव्ह उत्तर इस्रायलमधील पेटा टिकवा येथे राहतात. त्यांनी सांगितलं की, शहाफनं रेव्ह म्युझिक पार्टीत हत्याकांडात मारल्या गेलेल्या तिच्या काही मित्रांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली होती. हमासनं केलेल्या हल्ल्यात या पार्टीतील 270 तरुणांचा मृत्यू झाला होता.