न्युयॉर्क Israel Hamas War :अँटोनियो गुटेरेस यांनी न्यूयॉर्कमध्ये पत्रकारांना सांगितलं की, गाझामधील दुःस्वप्न हे मानवतावादी संकटापेक्षा जास्त आहे. हे मानवतेचं संकट आहे. ते पुढं म्हणाले की, प्रत्येक तासागणिक युद्धविरामाची गरज अधिक तीव्र होत आहे. संघर्षातील पक्ष आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला हा अमानवी सामूहिक त्रास थांबवण्याची आणि गाझाला मानवतावादी मदतीचा नाट्यमयपणे विस्तार करण्याची त्वरित आणि मूलभूत जबाबदारी आहे.
युद्धाला एक महिना पुर्ण : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला आज जवळपास एक महिन्यांचा कालावधी पूर्ण झालाय. या युद्धात आतापर्यंत 12 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जातंय. 7 ऑक्टोबर 2023 रोजी पॅलेस्टाईन दहशतवादी संघटना हमासनं इस्रायलवर हजारो क्षेपणास्रांचा मारा करत या युद्धाला सुरुवात केली होती. त्यानंतर या प्रत्यूत्तर देत हमासचा खात्मा करण्याासाठी इस्रायलही युद्धात उतरलं. मागील एका महिन्यापासून हा संघर्ष सुरुच असून युद्ध थांबण्याची चिन्ह दिसत नाही. इस्रायल आणि हमास युद्धात 10 हजारांहून अधिक पॅलेस्टाईन लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती गाझा पट्टीच्या आरोग्य मंत्रालयानं दिलीय. इस्रायलकडून हमासला लक्ष्य करण्यासाठी गाझा पट्टीवर सातत्यानं हल्ले सुरु आहेत. यामुळं गाझातील नागरिकांची अवस्था फार बिकट झाली असून गाझातील नागरिकांना अन्न-पाणी मिळणंही कठीण झालंय.