गाझा Israel Hamas War : इस्रायल आणि हमास यांच्यात सुमारे एक आठवड्याच्या युद्धविरामानंतर पुन्हा एकदा संघर्ष सुरु झालाय. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारच्या लढाईत पहिल्या तासात गाझा पट्टीमधील घरं आणि इमारतींवर झालेल्या इस्रायली हल्ल्यात किमान 178 नागरिक मारले गेले. इस्रायलनं हमासच्या 200 हून अधिक स्थळांवर हल्ला केल्याचं या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
कतारचे युद्धबंदी करण्याचे प्रयत्न : गाझामधील अतिरेक्यांनी इस्रायलवर पुन्हा रॉकेट गोळीबार सुरु केला. लेबनॉनच्या उत्तर सीमेवर इस्रायल आणि हिजबुल्लाह दहशतवाद्यांमध्ये लढाई सुरु झाली. मध्यस्थ कतारनं सांगितलं की, युद्धबंदी वाढवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. इस्रायलनं गाझामधील बहुतेक लष्करी हालचाली थांबवल्या आणि अतिरेक्यांनी पकडलेल्या 100 हून अधिक ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात 300 पॅलेस्टाईन कैद्यांची सुटका केली.
अद्यापही 137 इस्रायली ओलिस : इस्रायलचं म्हणणं आहे की, 115 पुरुष, 20 महिला आणि दोन मुलं अजूनही बंदिवान आहेत. इस्रायली बॉम्बफेक आणि ग्राउंड मोहिमेच्या आठवड्यांमुळं गाझाच्या 2.3 दशलक्ष रहिवाशांपैकी तीन चतुर्थांश नागरिक बेघर झाले आहेत. त्यामुळं मोठं संकट निर्माण झालंय. अन्न, पाणी आणि इतर पुरवठ्याची व्यापक टंचाई निर्माण झालीय.