महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

Israel Hamas Conflict : इस्रायली गुप्तचर यंत्रणेच्या अपयशामुळे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या नेतृत्वाला धोका? - Israel Hamas

Israel Hamas Conflict : हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायली गुप्तचर यंत्रणेचं अपयश जगासमोर आलं. हल्ल्यापूर्वी, पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निषेधार्थ इस्रायलमधील हजारो लोक दर आठवड्याला रस्त्यावर उतरत होते. या सर्वाचा नेतन्याहूंच्या नेतृत्वावर काही परिणाम होईल का? वाचा 'ईटीव्ही भारत'चे अरुणिम भुयान यांचा हा खास रिपोर्ट..

Netanyahu
नेतन्याहू

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 8, 2023, 10:50 PM IST

नवी दिल्ली Israel Hamas Conflict: हमास या दहशतवादी संघटनेनं शनिवारी सकाळी इस्रायलवर अचानक हल्ला केला. हमासनं याला 'ऑपरेशन अल अक्सा फ्लड' असं नाव दिलंय. हमासच्या या हल्ल्याकडे ५० वर्षांपूर्वीच्या योम किप्पूर युद्धाची पुनरावृत्ती म्हणून पाहिलं जातंय. विशेष म्हणजे, यावेळीप्रमाणे तेव्हाही इस्रायली गुप्तचर विभाग हल्ल्यापासून पूर्णपणे अनभिज्ञ होता.

१९७३ मध्ये तत्कालीन पंतप्रधानांनी राजीनामा दिला : ६ ऑक्टोबर १९७३ रोजी ज्यूंचा योम किप्पूर हा पवित्र दिवस होता. या दिवशी इजिप्शियन आणि सीरियन रणगाड्यांनी युद्धविराम ओलांडत सिनाई द्वीपकल्प आणि गोलान हाइट्समध्ये प्रवेश केला. मात्र, त्यानंतर इस्रायली सैन्य पूर्णपणे सतर्क झालं. तीन दिवसांच्या जोरदार लढाईनंतर इस्रायलनं इजिप्तचं आक्रमण थांबवलं. या युद्धात झालेल्या मोठ्या जीवितहानीकडे इस्रायलचे तत्कालीन पंतप्रधान गोल्डा मीर यांचं अपयश म्हणून पाहिलं गेल. त्यानंतर १९७४ मध्ये त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. योम किप्पूर युद्धात २६५६ इस्रायली सैनिक मारले गेले, तर ७२५१ जखमी झाले. युद्धात शत्रूनं सुमारे २९४ युद्धकैदी पकडले होते.

इस्रायली गुप्तचर यंत्रणा पूर्णपणे अनभिज्ञ होती : योगायोगानं, हमासनं शनिवारी गाझातून 'ऑपरेशन अल अक्सा फ्लड' लाँच केलं, त्या दिवशी सिमचट तोराह या ज्यूंच्या पवित्र सणाची सुट्टी होती. ज्याप्रमाणे, १९७३ मध्ये इस्रायली गुप्तचर यंत्रणा पूर्णपणे अनभिज्ञ होती, तशीच स्थिती यावेळेसही होती. हा हल्ला इस्रायलच्या मोबाईल ऑल-वेदर एअर डिफेन्स सिस्टम आयर्न डोममध्ये करण्यात आला. ही यंत्रणा ४ किमी ते ७० किमीच्या अंतरावरून डागलेले शॉर्ट-रेंज रॉकेट रोखण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी डिझाइन केलेली आहे. या हल्ल्यामध्ये इस्रायलमध्ये मृत पावलेल्यांची संख्या ५०० ते ६०० च्या दरम्यान असल्याचं सांगितलं जात आहे. इस्रायलनं प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात गाझामधील ३०० हून अधिक लोक मृत पावले आहेत.

इस्रायलमध्ये राजकीय गोंधळ : इस्रायलमध्ये पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखालील अतिउजव्या आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर आधीच देशांतर्गत राजकीय गोंधळ उडाला आहे. त्यामुळे आता नेतन्याहू यांचे नेतृत्व धोक्यात येईल का? सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) मधील भारताचे माजी राजदूत तलमीझ अहमद यांनी या विषयावर 'ईटीव्ही भारत'शी खास बातचीत केली. ते म्हणाले की, 'नेतन्याहू यांनी स्वतःला त्यांच्या देशातील अति उजव्या विचारसरणीच्या घटकांशी जोडलं आहे. हे घटक देशात उपेक्षित होते, मात्र नेतन्याहू यांनी त्यांना मुख्य प्रवाहात आणलं.

नेतन्याहू खटल्याचा सामना करत आहेत : अहमद म्हणाले की, नेतन्याहू यांना हे घटक मुख्य प्रवाहात आणावे लागले, कारण त्यांना गुन्हेगारी खटल्यापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सरकारमध्ये राहणं आवश्यक होतं. ते म्हणाले की, 'देशाच्या घटनेत बदल घडवून आणण्यासाठी त्यांना त्यांच्या मदतीची गरज आहे. इस्रायलचे पंतप्रधान म्हणून चौथ्या आणि पाचव्या कार्यकाळात नेतन्याहू लाचखोरी, फसवणूक आणि विश्वास भंग केल्याच्या आरोपांच्या न्यायालयीन चौकशीनंतर खटल्याचा सामना करत आहेत.

नेतन्याहू यांच्यावर गंभीर आरोप आहेत : इस्रायली पोलिसांनी डिसेंबर २०१६ मध्ये नेतन्याहू यांची चौकशी सुरू केली. नंतर त्यांच्यावर आरोप ठेवण्याची शिफारस केली. नोव्हेंबर २०१९ मध्ये, नेतन्याहू यांना अधिकृतपणे विश्वासभंग, लाच स्वीकारणे आणि फसवणूक केल्याबद्दल दोषी ठरविण्यात आलं. यामुळे त्यांना पंतप्रधानपद वगळता त्यांच्या मंत्रालयाचे पोर्टफोलिओ कायदेशीररित्या सोडावे लागले. जेरुसलेम जिल्हा न्यायालयात नेतन्याहूंचा खटला मे २०२० मध्ये सुरू झाला. एप्रिल २०२१ मध्ये साक्षीदारांची साक्ष सुरू झाली. फौजदारी खटला अजूनही चालू आहे.

सध्याचा संघर्ष ज्यू अतिरेक्यांमुळे घडला : सध्याच्या संघर्षाबद्दल बोलताना अहमद म्हणाले की, 'ज्यू अतिरेकी घटकांमुळे हे घडलं आहे. ते म्हणाले की, काही महिन्यांपूर्वीपर्यंत हमासनं संयम राखला होता. या वर्षी एप्रिलमध्ये त्यांनी इस्रायलींविरुद्ध इस्लामिक जिहाद बंडखोरीमध्ये भाग घेतला नाही. मात्र नेतन्याहू यांनी नवीन सरकार स्थापन केल्यापासून गेल्या वर्षभरात पॅलेस्टिनींविरुद्ध लक्षणीय बंडखोरी झाली. अहमद म्हणाले की, 'वेस्ट बँकमधील इस्रायली पॅलेस्टिनींवर हल्ले करत आहेत. दुसरे म्हणजे, यांना इस्रायलच्या सुरक्षा दलांनी सतत पाठिंबा दिलाय.

अल अक्सा मशिदीची विटंबना केली : अलीकडच्या काळात जेरुसलेममधील अल अक्सा मशिदीची इस्रायली धार्मिक कट्टरपंथ्यांनी विटंबना केली होती. माजी राजदूतांनी याकडेही लक्ष वेधलं. अल अक्सा मशिदीला ज्यू आणि मुस्लिम दोघेही पवित्र मानतात. ज्यू या जागेला टेंपल माउंट म्हणतात. गेल्या महिन्यात, इस्रायली सैन्यानं अल अक्सा मशिदीतून उपासकांना बाहेर काढण्यासाठी कडक सुरक्षा उपाय लागू केले. त्यानंतर येथे कोणत्याही वयाच्या पॅलेस्टिनीला प्रवेश नाकारण्यात आला.

नेतन्याहू अतिरेकी घटकांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी : अलीकडच्या काही दिवसांत, राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इटामार बेन-गवीर सारख्या इस्रायली धार्मिक राष्ट्रवाद्यांनी अल अक्सा मशिदीला भेटी दिल्या. गेल्या आठवड्यात, शेकडो अल्ट्रा-ऑर्थोडॉक्स ज्यू आणि इस्रायली कार्यकर्त्यांनी सुक्कोटच्या ज्यू कापणी उत्सवादरम्यान मशिदीला भेट दिली. याचा हमासनं निषेध केला आहे. त्यांनी आरोप लावला की, तेथे प्रार्थना करणारे यहूदी यथास्थिती कराराचे उल्लंघन करतात. अहमद म्हणाले की, 'नेतन्याहू या अतिरेकी घटकांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणूनच हमासनं सध्याच्या ऑपरेशनला 'अल अक्सा फ्लड' म्हटलंय.

गुप्तचर यंत्रणेच्या अपयशावर गंभीर प्रश्न उपस्थित : त्यामुळे आता नेतन्याहू यांच्या नेतृत्वावर परिणाम होईल का? अहमद म्हणाले की, जोपर्यंत संघर्ष सुरू आहे, तोपर्यंत नेतान्याहू यांना परिणामांना सामोरं जावं लागणार नाही. परंतु एकदा संघर्ष संपला की, इस्रायली गुप्तचर यंत्रणेच्या या मोठ्या अपयशाबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले जातील. ते म्हणाले की, अलीकडच्या काळात, इस्रायल आणि पॅलेस्टिनी संघर्षादरम्यान, इस्रायलच्या बाजूने होणारी जीवितहानी एक अंकी किंवा दुहेरी अंकात होती. तर पॅलेस्टिनी बाजूच्या मृत्यूनं तीन अंकी आकडा ओलांडला होता. मात्र यावेळी इस्रायलच्या बाजूनं तीन आकडा ओलांडल्यानं इस्रायलींच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. या संघर्षावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं सोमवारी बोलावलेल्या बैठकीबद्दल विचारले असता, याचा कोणताही उपयोग होणार नाही. यामध्ये केवळ हमासचा निषेध केला जाईल, असं अहमद म्हणाले.

हेही वाचा :

  1. Israel Hamas Conflict : हमासचा अचानक हल्ला इस्रायली गुप्तचर यंत्रणेचं अपयश, कसा झाला ५० वर्षांतील सर्वात मोठा हल्ला?
  2. Israel Palestine War : इस्रायल-गाझा दरम्यानच्या मोठ्या सैनिकी कारवाया, जाणून घ्या सविस्तर

ABOUT THE AUTHOR

...view details