वाशिंग्टन (अमेरिका)Israel Hamas Conflict :पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासनं इस्रायलवर जोरदार हल्ला चढवला आहे. शनिवारी सकाळी, हमासनं अचानक गाझामधून इस्रायली शहरांवर सुमारे 5,000 रॉकेट डागले. त्यामुळं युद्धाची भीती पाहता रविवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांनी हमासच्या हल्ल्याचा निषेध केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर बोलून सर्व मदतीचं आश्वासन दिलंय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हमासच्या हल्ल्यात आतापर्यंत 300 हून अधिक इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, इस्रायलच्या प्रत्युत्तरादाखल हल्ल्यात 200 हून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
इस्रायलवरील हल्ल्याचा निषेध :संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी इस्रायलवरील हल्ल्याचा निषेध केला आहे. व्यापक संघर्ष टाळण्यासाठी सर्व राजनैतिक आवाहन केलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन म्हणाले की, या संकटाच्या काळात मला जगाला, दहशतवाद्यांना सांगायचं, की अमेरिका इस्रायलच्या पाठीशी आहे. मी आज सकाळी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी बोललो आहे. मी त्यांना सांगितलं की अमेरिका इस्रायलच्या लोकांच्या पाठीशी आहे. युद्धात ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला दु:ख आहे. जखमी लवकरात लवकर बरे व्हावे अशी आमची इच्छा आहे.
ब्रिटन, जर्मनी या हल्ल्यामुळं हादरले :ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री जेम्स क्लीव्हर्ले यांनी हमासच्या हल्ल्याचा निषेध केला. त्यांनी इस्रायलच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराला नेहमीच पाठिंबा असल्याचं सांगितलंय. जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ म्हणाले की, इस्रायलवरील हल्ल्याच्या वृत्तानं त्यांना धक्का बसला आहे.