न्यूयॉर्क Israel Hamas Conflict : इस्राईल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या युद्धाबाबत आता संयुक्त राष्ट्र महासभेनं ( युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली ) ठराव केला आहे. मानवतावादाची जबाबदारी आणि नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी गाझामध्ये सुरू असलेलं युद्ध थांबवण्यात यावं, असा ठराव संयुक्त राष्ट्र महासभेनं केला आहे. भारतानं युद्धबंदी करण्यात यावी, या बाजुनं मतदान केलं आहे. युद्धबंदीच्या बाजुनं तब्बल 153 राष्ट्रांनी मतदान केलं. तर इस्रायल, अमेरिका आदी 10 देशांनी युद्धबंदीच्या विरोधात मतदान केलं आहे. युक्रेन, अर्जेंटीना, जर्मनी आदी 23 देश तटस्थ राहिले आहेत.
इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये युद्ध : हमासच्या दहशतवाद्यांनी 7 ऑक्टोबरला इस्रायलमध्ये हल्ला केल्यानंतर लाखो नागरिकांचा बळी गेला होता. त्यामुळे गाझामध्ये हमास आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू झालं होतं. या युद्धात दोन्ही देशाच्या नागरिकांचे बळी गेले आहेत. मात्र युद्धबंदी होत नसल्यानं या दोन्ही देशातील संघर्ष आणखी वाढत आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीनं या दोन देशात तात्पुरती युद्धबंदी झाली होती. मात्र त्यानंतर पुन्हा युद्धाला सुरुवात झाली आहे.
यूएनमध्ये युद्धबंदीचा ठराव :पॅलेस्टाईन आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाबाबत संयुक्त राष्ट्र महासभेनं ( UNGA ) युद्धबंदीचा ठराव केला आहे. या ठरावाच्या बाजुनं भारतानं मतदान केलं आहे. भारताच्या यूएनमधील स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी भारताच्या वतीनं ठरावाच्या बाजुनं मतदान केलं. यावेळी त्यांनी "इस्रायलमध्ये 7 ऑक्टोबरला दहशतवादी हल्ला झाला. तिथं मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. तिथल्या नागरिकांना ओलिस ठेवल्याची चिंता आहे. त्यामुळे हे मानवतावादी संकट असून त्यामुळं मोठी मानवी हानी होत आहे. महिला आणि लहान बालकांचं नुकसान होत आहे. त्यामुळं आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचं पालन करण्याची गरज आहे. पॅलेस्टाईन प्रश्नावर शांततापूर्ण मार्गानं कायमचा तोडगा काढणं गरजेचं आहे", असं रुचिरा कंबोज यांनी यावेळी स्पष्ट केलं.