नवी दिल्ली : आधी निक्की हेली, नंतर विवेक रामास्वामी आणि आता हर्षवर्धन सिंह. हे तिघेही भारतीय वंशाचे नेते असून, ते पुढील वर्षी होणाऱ्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या शर्यतीत सहभागी होणार आहेत. निक्की हेली या दक्षिण कॅरोलिनाच्या माजी गव्हर्नर आहेत. तर विवेक रामास्वामी हे उद्योगपती आहेत. आता उमेदवारीची घोषणा करणारे हर्षवर्धन सिंह हे एरोस्पेस इंजिनियर आहेत. (US President Race).
हर्षवर्धन सिंह रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत : हर्षवर्धन सिंह हे रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत. त्यांनी 2009 मध्ये न्यू जर्सी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, अलीकडच्या काळात ते ज्या प्रकारच्या कायदेशीर अडचणीत सापडले आहेत, ते पाहता त्यांचे पुढे काय होणार हा प्रश्न आहे. दुसरीकडे, रिपब्लिकन पक्षाकडून माईक पेन्स, रॉन डीसँटिस, ख्रिस क्रिस्टी, रायन बिंकले हे नेते देखील दावा करत आहेत. बिंकले एक पाद्री आहेत. तर पेन्स हे अमेरिकेचे उपाध्यक्ष राहिले आहेत. रॉन हे फ्लोरिडाचे गव्हर्नर राहिले आहेत. तर ख्रिस क्रिस्टी हे न्यू जर्सीचे माजी गव्हर्नर आहेत.
काय म्हणाले हर्षवर्धन सिंह : 38 वर्षांचे हर्षवर्धन सिंह यांनी काल त्यांच्या उमेदवारीची औपचारिक घोषणा केली. त्यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. ते यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, ते 2020 च्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत मागे राहिले होते. हर्षवर्धन सिंह यांनी अमेरिकन मूल्यांवर होणाऱ्या हल्ल्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या कौटुंबिक मूल्यांवर हल्ला होतो आहे, ज्याचा प्रतिकार करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
हर्षवर्धन सिंह ट्रम्पचे चाहते आहेत : कोरोनाच्या काळात मोठ्या फार्मा सेक्टर्सनी ज्या पद्धतीने संपूर्ण अमेरिकेला वेठीस धरले, त्याबाबत हर्षवर्धन सिंह यांचे मत पूर्णपणे वेगळे आहे. या कंपन्यांनी सर्व अमेरिकन नागरिकांना लस घेण्यास भाग पाडले आणि यातून प्रचंड नफा कमावला, असे त्यांचे म्हणणे आहे. सिंह म्हणाले की, याच कारणामुळे त्यांनी कधीही लसीकरण केले नाही. विशेष म्हणजे, हर्षवर्धन सिंह हे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे चाहते आहेत. सिंह म्हणाले की, अमेरिकेला ट्रम्प यांच्यासारख्या व्यक्तीची गरज आहे. मात्र, अमेरिकेने आता जुन्या राजकारण्यांऐवजी नव्या नेत्यांना प्रोत्साहन द्यावे, असेही ते म्हणाले.