नवी दिल्ली India Canada Row : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या भारत-कॅनडा वादात आता आणखी भर पडली आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर कॅनेडियन नागरिकाच्या हत्येच्या आरोपांचा पुनरुच्चार केला. "कॅनडाच्या भूमीवर एका कॅनेडियन नागरिकाच्या हत्येमध्ये भारताच्या एजंट्सचा सहभाग असल्याची विश्वासार्ह महिती आमच्याकडं आहे", असं ते म्हणाले.
मदतीसाठी भारताशी संपर्क साधला होता : अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांनी, कॅनडानं हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येचा तपास जारी राखावा आणि भारतानं त्यामध्ये मदत करावी, असं विधान केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना जस्टिन ट्रूडो म्हणाले की, "आमच्याकडं सुरुवातीपासूनच विश्वासार्ह माहिती होती की, कॅनडाच्या भूमीवर एका कॅनेडियन नागरिकाच्या हत्येमध्ये भारताच्या एजंटचा सहभाग होता. आम्ही या प्रकरणाच्या तपासात मदतीसाठी भारताशी संपर्क साधला होता. याशिवाय आम्ही अमेरिका आणि इतर मित्र देशांशीही याबाबत संपर्क साधला होता", असं स्पष्टीकरण जस्टिन ट्रूडो यांनी दिलं.
राजदुतांची हकालपट्टी केल्यानं निराशा : ते पुढे म्हणाले की, ही अशी गोष्ट आहे जी आम्ही खूप गांभीर्यानं घेत आहोत. "कॅनडा हा एक देश आहे जो नेहमी कायद्याच्या राज्यासाठी उभा राहील. जर मोठे देश परिणामांचा विचार न करता आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन करू लागले, तर ते संपूर्ण जगासाठी धोकादायक आहे", असं ते म्हणाले. "जेव्हा भारतानं व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केलं आणि भारतातील ४० हून अधिक कॅनेडियन राजदूतांची राजनैतिक शक्ती हिसकावून घेतली, तेव्हा आम्ही खूप निराश झालो होतो", असं ते म्हणाले.
भारतानं व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केलं : पुढं बोलताना जस्टिन ट्रूडो यांनी, भारतानं व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केल्याच्या आरोपांचा पुनरुच्चार केला. "कॅनडाच्या भूमीवर कॅनेडियन नागरिकाच्या हत्येमध्ये भारताचे एजंट सामील असू शकतात, असं मानण्याचे भक्कम पुरावे आमच्याकडं आहेत. मात्र भारत सरकारनं यावर प्रतिक्रिया देत, संपूर्ण कॅनेडियन राजदूतांना हाकलून लावलं. हे व्हिएन्ना कराराच्या अंतर्गत राजदूतांच्या अधिकारांचं उल्लंघन आहे", असा आरोप ट्रूडोंनी लावला.
हेही वाचा :
- S Jaishankar : 'लोकशाहीबाबत इतर कोणाकडून शिकण्याची गरज नाही', परराष्ट्रमंत्री एस जयशंकर अमेरिकेत 'गरजले'
- Hardeep Singh Nijjar : प्लंबर ते कुख्यात खलिस्तानवादी; कोण आहे हरदीपसिंग निज्जर?