वॉशिंग्टन डी. सी -कोरोना रुग्णांनी जगात नवा विक्रम नोंदविला आहे. गेल्या 24 तासांत जगभरात 1 लाख 88 हजार 278 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 3 हजार 502 जणांचा मृत्यू झाला आहे. तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, कोरोनाबाधित देशांमध्ये अमेरिका पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आहे.
अद्यावयत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत जगभरात 1 कोटी 30 लाख 27 हजार 844 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 5 लाख 71 हजार 76 कोरोनाबाधित रुग्णांची मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 75 लाख 75 हजार 523 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
जगभरातील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी कोरोनाचा सर्वांत जास्त फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत 34 लाख 13 हजार 950 जणांना कोरोनाची बाधा असून 1 लाख 37 हजार 782 जणांचा बळी गेला आहे. परंतु, आता दरदिवशी ब्राझीलमध्ये अमेरिकेपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. ब्राझिलमध्ये 18 लाख 66 हजार 176 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 72 हजार 151 जणांचा मृत्यू झाला आहे. तर यापाठोपाठ भारत, रशिया, पेरूमध्ये कोरोना रुग्ण आढळले आहेत.
कोरोना संसर्गावरील ताज्या आकडेवारीवरून असे सूचित होते की, जगात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या तीन दिवसांत कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे. चीन टॉप-10 कोरोना बाधित देशांच्या यादीतून बाहेर पडला आहे, तर भारताचा समावेश कोरोना बाधित टॉप-3 देशांमध्ये झाला आहे.