डेहराडून (उत्तराखंड): कुरापतखोर शेजारी देश चीन आपल्या भारतीय सीमेला लागून असलेल्या भागात सतत बांधकामे करत आहे. आपल्या कुटील कारवायांनी भारताला सतत अडचणीत आणण्याचा प्रयत्न चीन करत आहे. इंटेल लॅबचे विश्लेषक डॅमियन सायमन यांनी ट्विट करून चीनच्या या कृत्याचा खुलासा केला आहे. आता चीन तिबेटमध्ये भारताच्या सीमेजवळ वेगाने नवीन धरण बांधत असल्याचे सॅटेलाईट चित्रांवरून स्पष्ट झाले आहे.
भारत, नेपाळसाठी चिंतेची बाब:तिबेटमधील माब्जा झांगबो नदीच्या काठावर चीन नवीन धरण बांधत आहे. जी केवळ भारतासाठीच नाही तर नेपाळसाठीही चिंतेची बाब आहे. या धरणाच्या बांधकामाचे सॅटेलाइट चित्रही समोर आले आहे. हे नवीन धरण ट्राय जंक्शनच्या उत्तरेस १६ किमी अंतरावर आहे आणि उत्तराखंडच्या कालापानी प्रदेशाच्या समोर स्थित आहे. माब्जा झांगबो नदी तिबेटच्या नागरी काउंटीमध्ये येते. जी नेपाळमार्गे भारतातील घाघरा नदीत येते आणि नंतर गंगा नदीला मिळते.
उपग्रह चित्र ट्विटरवर केले शेअर: इंटेल लॅबमधील भू-स्थानिक बुद्धिमत्ता संशोधक डॅमियन सायमन यांनी एका ट्विटमध्ये उपग्रह चित्र शेअर केले आणि सांगितले की, येथे धरणाचे बांधकाम सुरू आहे. मे २०२१ पासून हे काम सुरू असल्याचे चित्रांमध्ये दिसून येते. ट्विटमध्ये म्हटले आहे की, 2021 पासून चीन सीमेवरील ट्राय जंक्शनपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या माब्जा झांगबो नदीवर धरण बांधत आहे.