टोरंटो Canada Indian Diplomat : भारत-कॅनडा राजनैतिक संबंध सध्या अत्यंत नाजूक परिस्थितीतून जात आहेत. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे कॅनडामध्ये भारतविरोधी कारवाया करणाऱ्या खलिस्तान्यांंचं समर्थन करत असल्यानं भारत सरकार त्यांच्यावर नाराज आहे. नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या जी २० परिषदेतदरम्यान याचा प्रत्यय आला. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जस्टिन ट्रुडो यांचं अत्यंत साध्या पद्धतीनं स्वागतं केलं. त्यांच्या देहबोलीत नेहमी प्रमाणे उत्साह दिसला नाही. दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी जस्टिन ट्रुडो यांची बंद दाराआड चांगलीच खरडपट्टी काढल्याचीही बातमी आली होती. गेल्या काही महिन्यांपासून भारत-कॅनडा यांच्यातील संबंध तणावपूर्ण आहेत. दोन्ही देशांमध्ये व्यापार चर्चाही विस्कळीत झाली आहे.
भारतीय राजदूताची हकालपट्टी : या पार्श्वभूमीवर, आता कॅनडातून एक महत्वाची बातमी समोर येते आहे. सोमवारी कॅनडानं एका उच्च भारतीय राजदूताची हकालपट्टी केली. कॅनडा सरकारनं आरोप केला आहे की, भारतीय राजदूत कॅनडातील एका खलिस्तान समर्थकाच्या हत्येत सामील आहे. पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, खलिस्तानचे खंबीर समर्थक शीख नेते हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येमध्ये भारतीय राजदूताचा हात असल्याचे पुरेसे पुरावे आहेत.
जो बायडन यांच्यासमोरही मुद्दा उपस्थित केला : कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी सांगितलं की, कॅनडातील भारतीय राजदूताची हकालपट्टी करण्यात आली आहे. 'हे आरोप जर खरे ठरले तर ते आमच्या सार्वभौमत्वाचं आणि देशांनी एकमेकांशी कसं वागावे या सर्वात मूलभूत नियमाचं उल्लंघन होईल', असं त्या म्हणाल्या. यावर्षी १८ जून रोजी कॅनडातील ब्रिटिश कोलंबियाच्या सरे मधील शीख सांस्कृतिक केंद्राबाहेर हरदीपसिंग निज्जर याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. कॅनडाच्या गुप्तचर संस्था या प्रकरणाचा तपास करत आहेत. जोली म्हणाल्या की, ट्रूडो यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्यासमोरही हा मुद्दा उपस्थित केला होता.