महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

खशोग्गींच्या हत्येशी सौदी अरबच्या युवराजाचा संबंध असल्याचा ठोस पुरावा - यूएन तज्ज्ञ - jamal khashoggi murder

खशोग्गी यांच्या हत्येचा आदेश सौदी राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांनीच दिला, असे सीआयएने म्हटले होते. सीआयएकडे याविषयीचे पुरावेही आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीआयएच्या चौकशीतील निष्कर्षांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी आपला मित्रदेश सौदीवर कोणताही दंड लागू केला नाही.

पत्रकार खशोग्गी हत्या प्रकरण

By

Published : Jun 19, 2019, 9:15 PM IST

जिनिव्हा - सौदी पत्रकार जमाल खशोग्गी यांच्या मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या हत्येशी संबंधित ठोस पुरावे मिळाले आहेत. संयुक्त राष्ट्रांतर्फे दिलेल्या तज्ज्ञांच्या एका स्वतंत्र अहवालात सौदी अरबच्या युवराजाचा या हत्येशी संबंध असल्याचे म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांसाठी स्वतंत्रपणे शोध करणाऱ्या तज्ज्ञाने हे पुरावे मिळाल्याचे सांगितले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या विशेष प्रतिनिधी अॅग्नेस कॅल्लामार्ड यांनी याविषयी शोध केला. न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राबाहेरील अशा प्रकारच्या अनियंत्रित हत्यांच्या संदर्भात त्या विशेष प्रतिनिधी म्हणून काम करतात. त्यांनी सौदी युवराजांनीच ही हत्या घडवून आणल्याचे ठोस पुरावे मिळाले असल्याचे म्हटले आहे. तसेच, या प्रकरणी सौदी अरबच्या उच्चाधिकाऱ्यांची प्रत्येकाला व्यक्तिगतरीत्या प्रश्न विचारून चौकशी करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

सौदी क्राऊन प्रिन्सचा या हत्येशी संबंध असल्याचे विश्वसनीय पुरावे मिळाले आहेत, असे संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञ अॅग्नेस यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी आंतरराष्ट्रीय स्तरावर चौकशी सुरू करण्याची गरज असल्याचे अॅग्नेस यांनी म्हटले आहे.

खशोगी यांच्या हत्येने पत्रकारांचे स्वातंत्र्य धोक्यात असल्याचा मुद्दा अधोरेखित केला होता. तसेच, मानव अधिकार कार्यकर्त्यांनीही या हत्येचा निषेध केला होता. जगभरातील नेते, अमेरिकन सिनेटर्स यांनी या हत्येविषयी दुःख व्यक्त केले होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या प्रकरणात सीआयएच्या चौकशीतून आलेल्या निष्कर्षांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी मध्य-पूर्वेतील आपला मित्रदेश सौदीवर कोणताही दंड लागू केला नाही.

खशोग्गी यांच्या हत्येचा आदेश सौदी राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांनीच दिला होता, असे सीआयएने म्हटले होते. सीआयएकडे याविषयीचे पुरावेही आहेत. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये इस्तंबूल येथील सौदी वाणिज्य दूतावासात खशोग्गी यांची हत्या झाली होती. सौदीने आपल्याशी साधा संपर्कही न साधल्याचे खशोग्गी यांच्या प्रेयसीचे म्हणणे आहे.

खशोग्गी वॉशिंग्टन पोस्टसाठी स्तंभलेखन करत होते. त्यांनी सौदी अरबचे राजकुमार सलमान यांचे शासन आणि त्यांचा मुलगा मोहम्मद बिन सलमान यांच्या विरोधात अनेक लेख लिहिले होते. तुर्कीच्या राष्ट्रपतींनी सौदी पत्रकार जमाल खशोग्गी यांच्या हत्येसंदर्भात एक खुलासा केला होता. यानुसार खशोग्गी यांच्या हत्या प्रकरणातील एख ऑडिओ त्यांच्याजवळ आहे. याच एका मारेकऱ्याने "मला माहीत आहे कसे कापायचे आहे," असे म्हटले होते. हा ऑडिओ तुर्कीने अमेरिका आणि युरोपियन अधिकाऱ्यांनाही शेअर केला होता. इस्तंबुलमध्ये सौदी वाणिज्य दूतावासात खशोग्गी यांची हत्या ज्या प्रकारे झाली, त्यासाठी एर्दोगनने रियाधचाही निषेध केला होता. खशोग्गी त्यांच्या प्रेयसीशी लग्न करणार होते. यासाठी कागदपत्रे घेण्यासाठी ते सौदी दूतावासात गेले होते.

खशोग्गी यांच्या हत्येनंतर संपूर्ण जगभरात सौदी राजकुमार सलमान यांचा निषेध करण्यात आला. तर, सौदीने मात्र स्वतःवरील आरोपांचा इन्कार केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details