जिनेव्हा -जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाचा प्रसार होऊन एक वर्ष उलटले आहे. मात्र, कोरोना अटोक्यात आलेला नाही. कोरोनावर अनेक लसी तयार करण्यात आल्या आहेत. अनेक देशात लसीकरणही सुरू झाले आहे. मात्र, लसीकरणानंतरही अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. यातच कोरोना नियामांचे पालन करण्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधनोम घेब्रायसस यांनी दिला आहे. तसेच त्यांनी कोरोना लसीकरणाच्या असंतुलनावर चिंता व्यक्त केली. गरीब देशांमध्ये कोरोना लसीकरणामध्ये धक्कादायक असंतुलन आहे. 220 देशांपैकी 194 देशात लसीकरण सुरू करण्यात आले आहे. तर अद्याप 26 देशांमध्ये लसीकरण सुरू करण्यात आलेले नाही. या 26 देशांपैकी 7 देशांना लसीचा पुरवठा करण्यात आला असून तिथे लवकरच लसीकरणाला सुरवात करण्यात येणार आहे. तर येत्या काही दिवसांमध्ये आणखी पाच देशांना कोरोना लसीचा पुरवठा करण्यात येईल, असे टेड्रोस अधनोम घेब्रायसस यांनी सांगितले.
विविध कारणांमुळे 14 देशांमध्ये कोरोना लसीकरणाला सुरवात करण्यात आलेली नाही. काही देशांनी कोव्हॅक्सच्या माध्यमातून लसीकरण करण्याची विनंती केली नाही. काही देश लसीकरणासाठी अद्याप तयार नाहीत. तर काही देश येत्या आठवड्यात किंवा महिन्यात लसीकरण सुरू करण्याची योजना आखत आहेत, असे टेड्रोस अधनोम घेब्रायसस यांनी सांगितले.
लसीकरणात धक्कादायक असंतुलन