स्टॉकहोम - नोबेल पारितोषिक विजेत्यांची घोषणा 5 ते 12 ऑक्टोबरदरम्यान करण्यात येत आहे. शरीरविज्ञान/ वैद्यकशास्त्र या विषयामधील नोबेल पारितोषिक विजेत्यांच्या घोषणेपासून आज सुरवात करण्यात आली आहे. यावर्षीचा शरीरविज्ञान/ वैद्यकशास्त्र या विषयामधील नोबेल पारितोषिक हार्वे जे. आल्टर, मायकेल हॉफटन आणि चार्ल्स एम. राईस या तीन जणांना संयुक्तपणे देण्यात आले आहे. हिपाटायटिस सी विषाणूवरील उपचार शोधासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, जगभरात जवळपास 70 कोटी लोकांना हिपाटायटिस सी आजार आहे. या आजारामुळे प्रत्येक वर्षी 4 लाख मृत्यू होतात. हिपाटायटिस सी आजारामुळे यकृतामध्ये बिघाड होतो आणि कर्करोग होऊ शकतो.
आजच्या पुरस्कार घोषणेनंतर 6 ऑक्टोबरला भौतिकशास्त्र, 7 ऑक्टोबरला रसायनशास्त्र, 8 ऑक्टोबरला साहित्य, 9 ऑक्टोबरला शांतता आणि 12 ऑक्टोबरला अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी यांना मिळाला होता -शरीरविज्ञान/ वैद्यकशास्त्र या विषयामध्ये विल्यम जी. केलीन ज्युनिअर, सर पीटर जे रॅटक्लिफ आणि ग्रेग एल. सेमेंझा या तिघांना "पेशी ऑक्सिजनची उपलब्धता ओळखून त्यानुसार स्वतःला कशा जुळवून घेतात" या संशोधनासाठी 2019 चा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.
नोबेल पारितोषिक अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार -नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनांसाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. स्वीडिश वैज्ञानिक 'अल्फ्रेड नोबेल'ने आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली. त्याच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी इ.स. 1901 मध्ये सर्वप्रथम हे पुरस्कार देण्यात आले होते.