लंडन - कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर गुणकारी ठरणाऱ्या डेक्सामेथासॉन या स्टेरॉईडच्या वापरासाठी बुधवारी परवानगी देण्यात आली. ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्विसला ही परवानगी देण्यात आली आहे. या स्टेरॉईड कोरोनाच्या गंभीर रुग्णांमधील मृत्यूचे प्रमाण ३५ टक्क्यांनी कमी करते.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितनुसार, मंगळवारी या स्टेरॉईडबाबतच्या संशोधनाचा अहवाल समोर आल्यानंतर, तातडीने याचा वापर सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. देशातील रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरवर असणाऱ्या आणि ऑक्सिजन पुरवठ्याची गरज भासणाऱ्या सर्व रुग्णांना हे स्टेरॉईड देण्यास सांगण्यात आले आहे.
यावर प्रतिक्रिया देताना; जगात सर्वप्रथम पूर्णपणे विश्वासार्ह आणि वापरण्याजोगे औषध शोधणाऱ्या आमच्या संशोधकांचा मला अभिमान वाटतो, असे मत देशाचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी व्यक्त केले.
काय आहे डेक्सामेथासॉन..?
कोविड-१९ रुग्णांच्या जगण्याची शक्यता वाढवणाऱ्या औषधाचा शोध लावल्याचा लंडनच्या संशोधकांनी दावा केला आहे. 'डेक्सामेथासॉन' हे स्टेरॉईड कोरोनावर प्रभावी ठरत असल्याचे पुराव्यानिशी दाखवून दिल्याचे या संशोधकांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे हे स्टेरॉईड स्वस्त आणि जगभरात सगळीकडे सहजरीत्या उपलब्ध होईल असे आहे.
याविषयी झालेल्या संशोधनाचे निष्कर्ष मंगळवारी समोर आले, लवकरच ते प्रसिद्धही केले जातील, असे या संशोधकांनी सांगितले. यामध्ये त्यांनी २,१०४ रुग्णांची निवड करुन त्यांना हे औषध वापरण्यास सांगितले होते. तर ४,३२१ रुग्णांवर नेहमीप्रमाणे उपचार सुरू ठेवले होते. २८ दिवसांनंतर असे समोर आले, की या औषधामुळे ज्यांच्यावर श्वसनयंत्राच्या मदतीने उपचार केले जात होते, अशा रुग्णांमध्ये मृत्यूची शक्यता ३५ टक्क्यांनी घटली, तर ज्यांना केवळ काही प्रमाणात ऑक्सिजन पुरवठ्याची गरज होती, अशा रुग्णांमध्ये मृत्यूची शक्यता २० टक्क्यांनी घटल्याचे समोर आले आहे. त्याहून कमी आजारी असलेल्या रुग्णांवर मात्र याचा तितकासा परिणाम दिसून आला नाही.
हेही वाचा :कोविड-१९: अचूक औषधे अन् लस निर्मितीसाठी शास्त्रज्ञांनी विकसित केला मानवी इम्युनोमचा 'ऑनलाइन ॲटलस'