मॉस्को : रशियाचे उपपंतप्रधान युरी ट्रुटनेव यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर, युरी यांंनी पंतप्रधान मिखाईल मिशुस्टीन यांच्यासोबतची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. शिनुआ वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी युरी पूर्व रशियाच्या दौऱ्यावर जाणार होते. त्यापूर्वी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये त्यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. यामुळे त्यांचा हा दौरादेखील पुढे ढकलण्यात आला आहे.
दोनच दिवसांपूर्वी रशियाने जगातील पहिल्या कोरोनावरील लसीची नोंद केली होती. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी आपल्या मुलीलाही या लसीचा डोस दिल्याचे सांगितले होते. तसेच, या लसीची पहिली बॅच येत्या दोन आठवड्यांमध्ये उपलब्ध होईल, असे रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले होते.
दरम्यान, गेल्या २४ तासांमध्ये रशियात ५ हजार १०२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यानंतर देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ९ लाख २ हजार ७०१ वर पोहोचली आहे. तसेच, देशात आतापर्यंत कोरोनामुळे १५ हजार २३१ लोकांचा मृत्यू झाला आहे.