बर्लिन - आपल्याकडे सोन्याला एक वेगळं महत्त्व आहे. सोने म्हटलं की दागिने आठवतात. सोन्यामध्ये गुंतवणुकही केली जाते. तसेच उत्खननात सोने सापडल्याच्या अनेक घटना आपण वाचल्या असतील. अशीच एक घटना जर्मनीमध्ये घडली आहे. जर्मनीमध्ये पुरातत्वशास्त्रज्ञांना 3800 वर्ष जुन्या थडग्यात सोन्याचे दागिने मिळाले आहेत. हे सोने सर्वात जुने असल्याचे म्हटले जाते.
पुरातत्वशास्त्रज्ञांनी उकरले 3800 वर्ष जुने थडगे पश्चिम जर्मनीतील पुरातत्वशास्त्रज्ञांना जगातील सर्वात प्राचीन सोन्याचे दागिने सापडले आहेत. खरं तर, पुरातत्वशास्त्रज्ञांनी 3800 वर्षांपूर्वी मरण पावलेल्या एका महिलेचे थडगे उकरले. या महिलेच्या थडग्यात हे सोने सापडले आहे. हे थडगे 2020 मध्येच उकरण्यात आले होते. मात्र, याची माहिती संशोधनकर्त्यांनी 21 मेला जारी केली. थडग्यातील महिलेचा मृत्यू झाला. तेव्हा ती 20 वर्षांची असावी, असा अंदाज पुरातत्वशास्त्रज्ञांनी वर्तवला आहे.
Image credit: University of Tübingen, Institute of Prehistory and Medieval Archaeology दक्षिण-पश्चिम जर्मनी जर्मनीमध्ये सापडलेली ही सर्वात प्राचीन सोन्याची कलाकृती मानली जाते. ज्यामध्ये सुमारे 20% चांदी, 2% पेक्षा कमी तांबे, प्लॅटिनम आणि कथील भाग सापडले आहेत. तज्ञांच्या मते, या सोन्याची बनावट नदीत वाहून आलेल्या नैसर्गिक सोन्याच्या धातूकडे निर्देश करते.
सोन्याची रासायनिक रचना सूचित करते की हे सोने इंग्लंडच्या कॉर्नवॉल प्रदेशातील कार्नोन नदीतून वाहत आले. संशोधकांच्या म्हणण्यानुसार त्यावेळचे मौल्यवान धातू दक्षिण-पश्चिम जर्मेनीमध्ये आढळणं फारच दुर्लभ आहे. तुंबिगन जिल्ह्यात सापडलेल्या सोन्याच्या शोधावरून असे सूचित होते की मध्य युरोपमध्ये त्या वेळी ब्रिटन आणि फ्रान्सच्या सांस्कृतिक गटांचे वर्चस्व होते. महिलेलच्या सांगाड्यात कुठल्याच प्रकराची इजा किंवा आजाराचे पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे महिलेचा मृत्यू कशामुळे झाला, याचे कारण समोर आले नाही.
स्त्री उच्च सामाजिक वर्गाची होती, हे सोन्याची कलाकृतीमधू सूचित होते. महिलेच्या अवशेषांच्या तपासणीतून असे दिसून आले की तिचा मृत्यू इ.स.पू. 1700 ते 1850 या काळात झाला होता. त्यावेळी कदाचित दक्षिण-पश्चिम जर्मनीमध्ये लिखित नोंदी केल्या जात नसाव्यात. म्हणून महिलेची ओळख पटेल, असा कुठलीच नोंद आढळली नाही.