लंडन - ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी एक धक्कादायक बाब उघड केली आहे. कोरोना विषाणुमुळे जॉन्सन यांचा मृत्यू झाला असता, तर त्यासाठी सरकारने आकस्मिक योजना तयार करून ठेवली होती.
स्टॅलिन यांच्या मृत्यूवेळी देशासमोर जशी आपत्कालीन स्थिती आली होती, तशाच परिस्थितीमध्ये काय करायचे याबाबत सरकारने विचार सुरू केला होता. माझ्यासाठी तो फार कठीण काळ होता. माझी तब्येत दिवसेंदिवस ढासळत चालली होती, आणि सरकार आकस्मिक योजना आखत आहे याबाबतही मला माहिती होती. त्यामुळे मी बऱ्यापैकी आशा सोडल्या होत्या, असे जॉन्सन यांनी स्पष्ट केले.
२६ मार्चला जॉन्सन यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते, तर त्याच्या दहा दिवसांनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दवाखान्यात दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.
आपण कोरोनाविरुद्धची लढाई जिंकून परत आलो, याला कारण फक्त आरोग्य कर्मचाऱ्यांचे उत्कृष्ट काम आहे. मी स्वतः ला खरेच खूप नशीबवान समजतो, असेही जॉन्सन यावेळी म्हणाले. कोरोनातून बरे झाल्यानंतर २६ एप्रिलपासून जॉन्सन यांनी आपला कार्यभार स्वीकारला होता.
हेही वाचा :चीनमध्ये १४ नवे कोरोनाबाधित आढळलेत; बाधितांचा आकडा ८२ हजार पार