नवी दिल्ली : शनिवारी पंतप्रधान मोदींनी भारत आणि युरोपियन युनियनच्या परिषदेला हजेरी लावली होती. यामध्ये युरोपियन युनियनचे सदस्य असलेल्या सर्व देशांचे प्रमुख, तसेच युरोपियन काऊन्सिलचे प्रमुख आणि युरोपियन कमिशनचे प्रमुखही उपस्थित होते. व्हर्चुअली पार पडलेल्या या परिषदेमुळे युरोपियन युनियनमधील देशांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला असून, व्यापार, गुंतवणूक आणि परस्पर संबंधांना चालना मिळणार असल्याचे मत देशाचे माजी राजदूत जितेंद्र त्रिपाठी यांनी व्यक्त केले.
यावर्षी पहिल्यांदाच ही परिषद भारत आणि ईयू+२७ अशा प्रकारे पार पडली. भारतातील कोरोना परिस्थिती पाहता युरोपियन युनियनमधील देश स्वतः मदतीसाठी पुढे आले आहेत. युरोपियन युनियनशी भारताचे संबंध पहिल्यापासूनच चांगले राहिले आहेत. केवळ एखाद दुसरी अशी घटना असेल, ज्यामध्ये दोघांच्या (भारत आणि युरोपियन युनियन) मतांमध्ये भिन्नता होती. याचं सर्वात ताजं उदाहरण म्हणजे, कलम ३७० हटवणे. काश्मीरला विशेष दर्जा देणारे हे कलम हटवल्यानंतर युरोपियन युनियनमधील कित्येक देशांनी भारतावर टीका केली होती. याव्यतिरिक्त दोघांचे संबंध चांगलेच राहिले आहेत, असे त्रिपाठी यांनी सांगितले.