पॅरिस- फ्रान्स देशातील पॅरिसमध्ये युनेस्कोची ४० वी बैठक सुरू आहे. यामध्ये भारताने काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तानच्या खोट्या प्रचाराची पोलखोल केली. आर्थिक मंदीत अडकलेला पाकिस्तान दहशतवादाचा डीएनए असल्याचे भारताच्या प्रतिनिधी अनन्या अग्रवाल यांनी जगाला ठणकावून सांगितले.
अनन्या अग्रवाल, युनेस्कोमध्ये बोलताना पाकिस्तानात कट्टरतावादी आणि दहशतवादाची मुळे खोलवर रुजलेली आहेत. पाकिस्तान युनेस्कोमध्ये भारतविरोधी खोटा प्रचार करुन राजकारण करत आहे. यावरून त्यांनी पाकिस्तानचा निषेध केला. पाकिस्तानच्या उलट्या बोंबा सुरु असल्याचे म्हणत त्यांनी अल्पसंख्यांचे पाकिस्तानमध्येच कसे हाल सुरू आहेत, याची आकडेवीर सादर केली. १९४७ मध्ये स्वतंत्र झाल्यानंतर पाकिस्तानात अल्पसंख्यंक २३ टक्के होते, ते आता ३ टक्क्यांवर आले आहेत. ख्रिश्चन, शीख, अहमदीया, पश्तून, हिंदु, सिंधी आणि बलुची या अल्पसंख्यंकांवर पाकिस्तान अत्याचार करत आहे. दैवनिंदा कायद्याच्या गैरवापराने अनेक अल्पसंख्यंक त्रास सहन करत आहेत. पाकिस्तानात बळजबरीने धर्मांतर करण्यात येते, तसेच लिंग आधारित भेदभाव पाकिस्तानात बोकाळलेला आहे, असे अग्रवाल यांनी सांगितले. पाकिस्तान संयुक्त राष्ट्राच्या मंचावरुन दुसऱ्या देशांना आण्विक युद्धाची धमकी देतो, तसेच त्यांच्या नागरिकांना युद्ध करण्यासाठी प्रोत्साहन देतो. नाजुक राष्ट्रांच्या यादीमध्ये पाकिस्तानचा १४ वा क्रमांक लागतो. कट्टरतावाद, आर्थिक दिवाळखोरी, दहशतवाद यामुळे पाकिस्तान एक अपयशी राष्ट्र म्हणुन पुढे आले आहे, असे अनन्या अग्रवाल यांनी सांगितले.