महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

पंतप्रधान मोदी आज जी-7 परिषदेत ट्रम्प यांना भेटणार

सध्या सुरू असलेल्या जी-7 परिषदेत पंतप्रधान मोदींची विविध देशांच्या प्रतिनिधींशी भेट होत आहे. यादरम्यान, काश्मीर मुद्दाही चर्चेस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची आहे.

जी-7

By

Published : Aug 26, 2019, 12:12 PM IST

Updated : Aug 26, 2019, 12:34 PM IST

बिअ‍रीत्ज / नवी दिल्ली -फ्रान्समध्ये जी-7 परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींची रविवारी संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिओ गुतारेस यांच्याशी भेट झाली. त्यांच्याशी विविध विषयांवरील चर्चा सफल झाल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. आज पंतप्रधान मोदींची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भेट होणार आहे. यामध्ये सध्याच्या काश्मीर मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताच्या दृष्टीनेही ही भेट महत्त्वाची आहे.

सध्या सुरू असलेल्या जी-7 परिषदेत पंतप्रधान मोदींची विविध देशांच्या प्रतिनिधींशी भेट होत आहे. यादरम्यान, काश्मीर मुद्दाही चर्चेस येण्याची शक्यता आहे. भारत-पाकिस्तानदरम्यान काश्मीर मुद्द्यावरून निर्माण झालेल्या तणावाकडे सध्या संपूर्ण जगभराचे लक्ष लागले आहे. तसेच, यावर जगभरातून येणाऱ्या प्रतिक्रिया भारतासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत. भारत या मुद्द्यावर जगातील देशांचा पाठिंबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. भारत हा जी-7 परिषदेचा सदस्य देश नाही. मात्र, फ्रान्सच्या आमंत्रणावरून पंतप्रधान मोदींनी भारतातर्फे यामध्ये सहभाग घेतला आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला गुतारेस यांनी भारत आणि पाकिस्तानला काश्मीर मुद्द्यावर संयम बाळगण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधान मोदी आणि गुतारेस यांच्या चर्चेच्या एक दिवस आधी पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांनी बोलून काश्मीरमधील स्थितीविषयी माहिती दिली होती. तर, भारताने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय समुदायासमोर आर्टिकल 370 विषयीचा निर्णय ही भारताची अंतर्गत बाब असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच, भारताने पाकिस्तानलाही ही बाब मान्य करण्याचे आवाहन केले होते.

महिन्याभरापूर्वीच पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्रम्प यांची भेट घेतली होती. त्यावेळी पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेला मदत करण्याच्या बदल्यात भारतासह मध्यस्थी करण्याची गळ घातली होती. यानंतर ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानदरम्यान मध्यस्थी करणे आवडेल, असे वक्तव्य केले होते. यावर भारतातील सर्व स्तरांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांतच जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम रद्द करण्याचा निर्णय भारतीय संसदेने घेतला. यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने जगभरात भारताविरोधात पाठिंबा मिळवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. तेव्हा ट्रम्प यांनीही हा भारताचा अंतर्गत मुद्दा असून पाकिस्तानसोबतच्या तणावाचा मुद्दा द्विपक्षीय असल्याचे म्हटले होते. यात अमेरिकेने हस्तक्षेप करण्याचा प्रश्न नसल्याचेही मान्य करत थेट घूमजाव केले होते. पाकिस्तानने काश्मीर मुद्द्यावर पुन्हा अमेरिकेकडे हात पसरल्यानंतर अमेरिकेने परत एकदा मध्यस्थीचा राग आळवला आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प आणि पंतप्रधान मोदींची चर्चा महत्त्वाची ठरणार आहे.

Last Updated : Aug 26, 2019, 12:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details