लंडन (यूके) : कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगातील अनेक देश आपापल्या आरोग्य सुविधांशी संघर्ष करताना दिसले. त्यामुळे संबंधित देशातील लोकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका नवीन अभ्यासानुसार, विलगीकरण कक्षातील केवळ एका विषाणू हॉटस्पॉटमुळे तो अवघ्या दहा तासात विलगीकरण कक्षाच्या जवळपास अर्ध्या पृष्ठभागापर्यंत पसरू शकतो, असा निष्कर्ष समोर आला आहे.
जर्नल ऑफ हॉस्पिटल इंफेक्शनमध्ये एका पत्रकाच्या स्वरूपात हा अभ्यास प्रकाशित करण्यात आला. या अभ्यासाचा मुख्य हेतू कोरोना विषाणूला कारणीभूत असणारा सार्स-सीओव्ही-२ विषाणू रुग्णालयाच्या पृष्ठभागावर कसा पसरतो, हे शोधणे हा होता.
युकेतील युनिव्हर्सिटी कॉलेज हॉस्पिटल (यूसीएल) आणि ग्रेट ऑरमंड स्ट्रीट हॉस्पिटल (जीओएसएच) च्या संशोधकांनी एका रुग्णालयातील बेडवर सोडलेल्या नमुना विषाणूचा डीएनए अवघ्या १० तासात त्या संबंधित विलगीकरण कक्षाच्या जवळपास अर्ध्या भागामध्ये पसरल्याचे नोंदवले आहे. तसेच हा विषाणू पुढचे किमान पाच दिवस तसाच कायम टिकून राहिल्याचेही सांगितले.
या प्रयोगासाठी थेट सार्स-सीओव्ही-२ विषाणूचा वापर करण्याऐवजी संशोधकांनी विषाणू संक्रमित वनस्पतीपासून डीएनएचा एक भाग कृत्रिमरित्या तयार केला. जो मानवांना संक्रमित करू शकत नाही. तसेच त्यांनी कोरोना बाधित रूग्णांच्या श्वसन यंत्रणेत सापडलेल्या सार्स-सीओव्ही-२ विषाणू प्रमाणेच समान तीव्रतेचा विषाणू एक मिलीलीटर पाण्यात सोडला.
तसेच संशोधकांनी विषाणूचे डीएनए मिसळलेले हे पाणी एका रुग्णालयातील बेडच्या हात ठेवण्याच्या जागेवर लावले. कारण अशा ठिकाणी रुग्णांकडून विषाणू संक्रमित होण्याचा धोका अधिक असतो. त्यानंतर पुढील पाच दिवसांमध्ये रुग्णालयाच्या वेगवेगळ्या ठिकाणाचे एकूण ४४ नमुने चाचणीसाठी घेण्यात आले.
१० तासानंतर संबंधित वॉर्डमध्ये ठेवलेल्या नमुना विषाणूचे अनुवांशिक घटक असणाऱ्या विषाणूंचा रुग्णालयातील ४१ टक्के पृष्ठभागावर प्रसार झाल्याचे संशोधकांच्या निदर्शनास आले. या विषाणूचे आनुवंशिक घटक बेडच्या रेलपासून ते दाराच्या कडीपर्यंत, तर प्रतिक्षा गृहातील आर्मरेस्टपासून मुलांच्या खेळण्यांवर आणि पुस्तकांवर अशा सर्व ठिकाणी आढळले.
या अभ्यासानुसार तीन दिवसांपर्यंत विषाणू पसरण्याचे प्रमाण ५९ टक्क्यांपर्यंत वाढले. तर पाचव्या दिवशी विषाणू पसरण्याच्या वेगात घट होऊन ते ४१ टक्क्यांपर्यंत खाली आले.
“विषाणूच्या संक्रमणामध्ये पृष्ठभागाची भूमीका किती महत्त्वाची आहे. त्याचबरोबर हाताची स्वच्छता आणि साफसफाईचे पालन करणे किती आवश्यक आहे, याचे महत्त्व आमच्या अभ्यासाने अधोरेखित केले आहे,” असे युसीएलच्या लेना सिरिक यांनी सांगितले.