नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. कोरोनाग्रस्ता आकडा 7 लाखांच्या पुढे गेला आहे. तर कोरोनामुळे 36 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. युरोपीय देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाचा प्रसार कमी झाला आहे. ही माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.
जगभरामध्ये तब्बल 7 लाख 54 हजार 948 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर कोरोनामुळे 36 हजार 571 लोकांचा बळी गेला आहे. चीननंतर युरोपात कोरोनाने थैमान घातले असून जगातील तब्बल 200 देशांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला आहे. चीन, ईटली, स्पेन, अमेरिकामध्ये सर्वांत जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत.
कोरोनामुळे जपानी प्रसिद्ध ज्येष्ठ कॉमेडियन केन शिमुरा यांचं निधन झालं आहे. तसेच स्पेनमधील राजघराण्यातील राजकुमारी मारिया टेरेसाचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला. तर इंग्लडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि ब्रिटिश राजघराण्याचे प्रिन्स चार्ल्स यांनी कोरोनाची लागण झाली आहे.
चीनमधील वूहान प्रांतामध्ये प्रथम आढळून आलेला कोरोना विषाणू आता जगातील प्रत्येक खंडामध्ये पोहोचला आहे. त्यामुळे जागतिक व्यापार, उद्योगधंदे, व्यवहार, प्रवासी वाहतूक, पर्यटन आणि एकंदरीत जनजीवन ठप्प झाले आहे. अनेक देशांनी लॉकडाऊनसह आरोग्य आणीबाणी जारी केली आहे. सगळ्याच देशांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे मास्क, आरोग्य सुरक्षा उपकरणे, व्हेंटिलेटर, गोळ्या औषधांची कमतरता भासू लागली आहे.