वॉशिंग्टन डीसी - संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातले असून सद्य परिस्थितीमध्ये कोरोनाचा सर्वांत जास्त प्रसार अमेरिकेमध्ये होत आहे. अमेरिकेमध्ये गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 2 हजार 600 जणांचा मृत्यू झाला आहे. जॉन हॉपकिन्सकडूनही माहिती देण्यात आली आहे.
अमेरिकेमध्ये आतापर्यंत 28 हजार 326 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 6 लाख 14 हजार 482 कोरोनाबाधित आहेत. न्यूयॉर्क आणि न्यूजर्सीमध्ये सर्वांत जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत.
अमेरिकेकडे सामर्थ्य आणि शक्ती आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत जागतिक स्तरावर ते अग्रस्थानी आहेत. तरीही एका सुक्ष्म जीवाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. महासत्ता प्रथमच एवढा संघर्ष करताना दिसत आहे. महामारीची तयारी दर्शविणाऱ्या निर्देशांकात 83.5 गुणांसह पहिल्या क्रमांकावर अमेरिकेस कोविड-19 चा सामना करताना कमालीचे अपयश आले आहे.
जगभरमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी अनेक देशांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोट्यवधी नागरिकांनी स्वत:ला घरांमध्ये कोंडून घेतले आहे. जागतिक व्यापार, पर्यटन, प्रवासी वाहतूक आणि उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.