महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

कंदाहार, हेरातवर तालिबानचा ताबा; दोन तृतीयांश अफगाणिस्तान सरकारच्या हातातून निसटले! - अफगाणिस्तानातील स्थिती

युद्धग्रस्त अफगाणिस्तानातील तालिबानचे वर्चस्व दिवसेंदिवस वाढत चालले असून तालिबानने आणखी दोन महत्वाच्या शहरांवर ताबा मिळविल्याचे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले. तालिबानने कंदाहार आणि हेरात ही दोन महत्वाची शहरे आपल्या ताब्यात घेतली असून आता तालिबानच्या हातात अफगाणिस्तानातील 34 प्रांतांपैकी 12 प्रांतांच्या राजधानी आल्या आहेत.

कंदाहार, हेरातवर तालिबानचा ताबा; दोन तृतीयांश अफगाणिस्तान सरकारच्या हातातून निसटले!
कंदाहार, हेरातवर तालिबानचा ताबा; दोन तृतीयांश अफगाणिस्तान सरकारच्या हातातून निसटले!

By

Published : Aug 13, 2021, 12:16 PM IST

काबूल : युद्धग्रस्त अफगाणिस्तानातील तालिबानचे वर्चस्व दिवसेंदिवस वाढत चालले असून तालिबानने आणखी दोन महत्वाच्या शहरांवर ताबा मिळविल्याचे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले. तालिबानने कंदाहार आणि हेरात ही दोन महत्वाची शहरे आपल्या ताब्यात घेतली असून आता तालिबानच्या हातात अफगाणिस्तानातील 34 प्रांतांपैकी 12 प्रांतांच्या राजधानी आल्या आहेत.

महत्वाची शहरे तालिबानच्या हातात

कंदाहार आणि हेरात ही अफगाणिस्तानातील अतिशय महत्वाची आणि मोठी शहरे असून या दोन शहरांवरील ताबा हा तालिबानसाठी मोठा विजय असल्याचे समजले जात आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलला आतापर्यंत थेट धोका नसला तरी तालिबानचे वाढते वर्चस्व हे विद्यमान सरकारसमोरील मोठे आव्हान समजले जात आहे. तालिबानकडे सद्यस्थितीत अफगाणिस्तानातील दोन तृतीयांश भागाचा ताबा असल्याचे सांगितले जात आहे.

हेरातचा असा झाला पाडाव

हेरातवर गेल्या दोन आठवड्यांपासून तालिबानी बंडखोरांकडून हल्ले सुरू होते. गुरूवारी दुपारी तालिबानी दहशतवाद्यांनी शहरात प्रवेश करत ताबा मिळविला. खासदार सेमीन बारेक्झाई यांनी शहराच्या पाडावाच्या वृत्ताला दुजोरा देताना हेरातमधील तुरूंगात कैद असलेले तालिबानी बंडखोर आता शहरात मुक्तपणे वावरत असल्याचे सांगितले आहे.

कंदाहारच्या पाडावाला अधिकृत दुजोरा नाही

तालिबानचे जन्मस्थान असलेल्या कंदाहारमध्ये बंडखोरांनी सरकारी कार्यालये आणि इमारती आपल्या ताब्यात घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. इथल्या सरकारी अधिकाऱ्यांनी विमानातून काबूलकडे प्रयाण केले आहे. मात्र सरकारने अजूनही कंदाहार पडल्याची अधिकृत कबुली दिलेली नाही. तालिबानने आधी तुरुंगावर हल्ला करत कैद्यांना मुक्त केल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

दूतावास रिकामे करण्यासाठी अमेरिका, ब्रिटनकडून सैन्याची रवानगी

अफगाणिस्तानातील सध्याची स्थिती पाहता काबूलमधील दूतावास रिकामा करण्यासाठी तिथे तीन हजार सैन्यांची कुमक पाठविण्याचे नियोजन अमेरिकेकडून केले जात आहे. तर अफगाणिस्तानातील ब्रिटिश नागरिकांना तिथून बाहेर काढण्यासाठी 600 सैनिकांची तुकडी अफगाणिस्तानात पाठविली जाणार असल्याचे ब्रिटनने म्हटले आहे. याशिवाय कॅनडाही आपले दूतावास रिकामे करण्यासाठी अफगाणिस्तानात सैन्य पाठवित आहे.

तालिबानच्या भीतीने नागरिकांचे पलायन

तालिबानच्या भीतीने अफगाणिस्तानातील हजारो नागरिक आपली घरे-दारे सोडून पलायन करत आहेत. इथली स्थिती पाहता महिलांच्या मानवाधिकारांचे हनन होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. अमेरिकन सैन्य गुप्तचर विभागाच्या अहवालानुसार तालिबानकडून येत्या काही महिन्यांत संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा केला जाऊ शकतो.

युएन प्रमुखांकडून चिंता

संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी अफगाणिस्तानच्या स्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. अफगाणिस्तान सरकार आणि तालिबानमधील दोहा येथील चर्चेतून तोडगा निघून संघर्ष संपण्याची आशा त्यांनी व्यक्त केली आहे. तालिबानमधील संघर्षात नागरी हानीविषयी आम्ही चिंतीत आहोत असे गुटेरेस यांनी म्हटले आहे.

31 ऑगस्टपर्यंत अमेरिकन सैन्य घेणार माघार

अफगाणिस्तानातून माघार घेण्यासाठी अमेरिकेला केवळ तीन आठवडे आणि एक दिवसांचा कालावधी उरलेला आहे. अमेरिका अफगाणिस्तानातून माघार घेत असतानाच तालिबानचा अफगाणिस्तानातील प्रभाव वाढत असून आतापर्यंत पाच प्रांतांच्या राजधानींवर तालिबानने ताबा मिळविला आहे. 31 ऑगस्टनंतर अमेरिकेकडून हवाई हल्ले सुरूच राहतील की नाही यावर बोलण्यास किर्बी यांनी नकार दिला आहे.

माघार घेण्यावर बायडेन प्रशासन ठाम

अफगाणिस्तानात तालिबानचा प्रभाव वाढत असला तरी अफगाणिस्तानातून या महिन्याच्या अखेरपर्यंत माघार घेण्यावर बायडेन प्रशासन ठाम असल्याचे व्हाईट हाऊसमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे. दरम्यान, 2001 मध्ये अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर तालिबान्यांना अफगाणिस्तानच्या सत्तेतून बाहेर काढण्यात आले होते.

हेही वाचा -"हे युद्ध आता अफगाणिस्तानचे आहे", पेंटागॉनची तालिबानवर हवाई हल्ले न करण्याची भूमिका

ABOUT THE AUTHOR

...view details