काबूल : युद्धग्रस्त अफगाणिस्तानात तालिबानचे वर्चस्व तासागणिक वाढताना दिसत असून शनिवारी तालिबानने राजधानी काबूलच्या दक्षिणेकडील प्रांतावर मिळवत मझार-ए-शरीफवर चौफेर हल्ला चढवला. यासोबतच अफगाण सरकारच्या ताब्यात असलेल्या प्रदेशात आणखीन घट झाली असून आता केवळ मझार-ए-शरीफ, काबूलसह मध्य व पूर्वेकडील फारच थोडा भाग अफगाण सरकारकडे उरला आहे. तालिबानने आतापर्यंत पश्चिम, उत्तर आणि दक्षिणेतील बहुतांश भूभागावर ताबा मिळविला आहे.
तालिबान काबूलपासून फक्त 80 किलोमीटर अंतरावर
तालिबानने संपूर्ण लोगार प्रांतावर ताबा मिळविला असून काबुलला लागून असलेल्या जिल्ह्यात तालिबानने प्रवेश केल्याचे खासदार होमा अहमदी यांनी सांगितले. तालिबानी सध्या राजधानी काबूलपासून केवळ 80 किलोमीटर अंतरावर असल्याचे त्यांनी सांगितले. तालिबानने उत्तर, पश्चिम आणि दक्षिणेकडील बहुतांश भागावर ताबा मिळविला आहे. तालिबानने मझार-ए-शरीफवर चौफेर हल्ला चढविला असून अद्याप यात कसल्याही हानीचे वृत्त नाही असे उत्तर बाल्ख प्रांताचे गव्हर्नर मुनीर अहमद फरहाद यांनी सांगितले. विशेष म्हणजे अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घनी यांनी बुधवारी मझार-ए-शरीफचा दौरा करत इथल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला होता.
अश्रफ घनी यांनी साधला देशवासीयांशी संवाद
अफगाणिस्तानात तालिबानचे वर्चस्व पुन्हा वाढू लागल्यानंतर राष्ट्रपती अश्रफ घनी यांनी शनिवारी प्रथमच देशवासियांशी टेलिव्हिजनवरून संवाद साधताना तालिबानशी सल्लामसलत सुरू असल्याचे सांगितले. गेल्या 20 वर्षांत जे काही मिळविले आहे ते कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही अशी परखड भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. मात्र तालिबानच्या वाढत्या वर्चस्वापुढे सरकारचा टिकाव लागत नसल्याचेच चित्र इथे सध्या दिसत आहे. सध्या अफगाण सरकारकडे मध्य आणि पूर्वेकडील काही प्रांत आणि काबूल तसेच मझार-ए-शरीफ या शहरांचाच ताबा उरला आहे.
कंदाहारमधील रेडिओ स्टेशनवर तालिबानचा ताबा
तालिबानने शनिवारी कंदाहारमधील मुख्य रेडिओ स्टेशनवर ताबा मिळविल्याचे एका व्हिडिओद्वारे जाहीर केले आहे. या रेडिओ स्टेशनला तालिबानने व्हॉईस ऑफ शरीया हे नाव दिले आहे. या रेडिओ स्टेशनवरील कर्मचारी हजर असून याद्वारे बातम्या, राजकीय विश्लेषण आणि कुराणची शिकवण प्रसारीत केली जाईल. याद्वारे संगीत प्रसारीत केले जाणार नाही असे या व्हिडिओतून तालिबानने म्हटले आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती कंदाहारवरील विजयाबद्दल तालिबानचे अभिनंदन करतानाही दिसतो. कंदाहारमधूनच तालिबानचा उगम झाला असून इथल्या नागरिकांना तालिबानचा पाठिंबा आहे. कंदाहारवर यापूर्वीच तालिबानने ताबा मिळविला आहे.
अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानात दाखल
अफगाणिस्तानातील अमेरिकन दुतावासातील अधिकारी आणि नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी अमेरिकन सैन्य दलाची पहिली तुकडी शनिवारी काबुलमध्ये दाखल झाली. अफगाणिस्तानातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी तीन हजार सैनिक पाठविण्याची घोषणा अमेरिकने यापूर्वीच केली आहे. याशिवाय ब्रिटन आणि कॅनडाकडूनही आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अफगाणिस्तानात सैन्य पाठविले जाणार आहे.
31 ऑगस्टपर्यंत अमेरिकन सैन्य घेणार माघार