इस्लामाबाद- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुलवामा हल्ल्यावर अखेर प्रतिक्रिया दिली आहे. पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याचे नाकारत त्यांनी उलट भारतावरच निशाणा साधला आहे. भारत पुराव्याशिवाय आरोप करत असून पुरावा द्या मग कारवाई करतो, अशा उलट्या बोंबा इम्रान खान यांनी ठोकल्या आहेत. तसेच या हल्ल्याचा संबंध त्यांनी भारतातील आगामी लोकसभा निवडणुकांशी जोडून या प्रकरणाला नवीनच वळण देण्याचा प्रयत्न केला.
पाकिस्तानच्या आता उलट्या बोंबा, इम्रान खान म्हणतात पुराव्याशिवाय आरोप केलाच कसा?
आम्हाला हिंसा नको आहे. मात्र, भारताने हल्ला केल्यावर आम्ही गप्पही बसणार नाही. जर तुम्ही युद्ध सुरू केले तर आम्ही ते संपवू, असे म्हणत त्यांनी भारताला युद्धाचा विचार न करण्याचाच इशारा दिला.
पाकिस्तानला सध्या स्थिरता हवी आहे. त्यामुळे आम्ही असे हल्ले करण्याचा विचारही करणार नाही. आम्हाला हिंसा नको आहे. मात्र, भारताने हल्ला केल्यावर आम्ही गप्पही बसणार नाही. जर तुम्ही युद्ध सुरू केले तर आम्ही ते संपवू, असे म्हणत त्यांनी भारताला युद्धाचा विचार न करण्याचाच इशारा दिला. काश्मीरप्रश्न फक्त चर्चेने सुटू शकतो, असे म्हणत त्यांनी नव्या पाकिस्तानात दहशतवादाला थारा नसल्याचे म्हटले आहे.
युद्ध सुरू करणे ही सोपी गोष्ट आहे. मात्र, ते संपवणे प्रचंड अवघड असून त्याचे परिणाम फक्त देवालाच माहित असे म्हणत त्यांनी पाकिस्तान युद्धासाठी उत्सुक नाही, असे सांगितले. दहशतावादाचा सर्वात जास्त फटका पाकिस्तानलाच बसला असून त्यांनी पुलवामा हल्ल्याचा पाकिस्तानशी संबंध असल्याचे नाकारले.