महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

पाकिस्तान विमान दुर्घटना; शंभरहून अधिक ठार.. - कराची विमान दुर्घटना

Aircraft with 98 onboard crashes in Pakistan's Karachi
पाकिस्तानमध्ये ९८ लोकांना घेऊन जाणारे प्रवासी विमान कोसळले; बचावकार्य सुरू..

By

Published : May 22, 2020, 4:09 PM IST

Updated : May 22, 2020, 9:09 PM IST

19:52 May 22

वैमानिकाचे शेवटचे शब्द..

विमान कोसळण्यापूर्वी वैमानिकाने एअर ट्रॅफिक कंट्रोलशी केलेले शेवटचे संभाषण जाहीर करण्यात आले आहे. यामधून असे समजत आहे, की पहिल्यांदा लँडिंगचा प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे तो वैमानिक पुन्हा वळून लँडिंग करण्याचा प्रयत्न करत होता.

"आम्ही थेट लँड करत आहोत, आमचे इंजिन निकामी झाले आहे", असे एक वैमानिक म्हणाला.

त्यावर एअर ट्रॅफिक कंट्रोलरने त्याला एक रनवे मोकळा असून, त्यावर विमान उतरवण्यास सांगितले.

त्यानंतर वैमानिकाचे शेवटचे शब्द होते, "सर मे-डे, मे-डे, मे-डे पाकिस्तान ८३०३"..

19:41 May 22

आतापर्यंत ११ मृतदेहांना काढले बाहेर..

पाकिस्तान विमान दुर्घटनेतील मृतदेहांना बाहेर काढताना..

एका स्थानिक वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, विमानाच्या पुढील भागात बसणाऱ्या तीन जणांचा जीव या दुर्घटनेत वाचला आहे. यामधील एक व्यक्ती बँक ऑफ पंजाबचे प्रमुख जफर मसूद असल्याचेही समजले आहे. तसेच, आतापर्यंत ११ मृतदेहांना बाहेर काढण्यात आले असून, एकूण सहा जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. बाहेर काढण्यात आलेले मृतदेह हे प्रवाशांचेच होते, की स्थानिक रहिवाशांचे याबाबत माहिती मिळाली नाही.

19:05 May 22

पाकिस्तान विमान दुर्घटना, प्रत्यक्षदर्शीची मुलाखत..

पाकिस्तान विमान दुर्घटना..

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वैमानिकाने दोन ते तीन वेळा हे विमान लँड करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर हे विमान खाली कोसळले. ताहीर हुसैन नावाच्या व्यक्तीने सांगितले, की यावेळी भूकंप होतो त्याप्रमाणे मोठा आवाज झाला. अचानक आभाळातून काहीतरी कोसळल्याप्रमाणे मोठा आवाज झाला, त्यानंतर आम्ही जेव्हा घराच्या छतावर गेलो, तर सगळीकडे धूर दिसत होता.

19:01 May 22

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही व्यक्त केले दुःख..

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. पाकिस्तानमधील विमान दुर्घटनेत मृत पावलेल्या लोकांच्या नातेवाईकांप्रती मी संवेदना व्यक्त करतो, तसेच जे जखमी आहेत त्यांची प्रकृती लवकर सुधारावी अशी आशा व्यक्त करतो असे मोदी यांनी ट्विट करत म्हटले आहे.

18:57 May 22

मदतकार्य सुरू आहे, तसेच तातडीने चौकशी समितीही स्थापन करण्यात आली आहे, इम्रान खान यांची माहिती..

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. या घटनेमुळे मला धक्का बसला असून, मी सध्या पीआयएच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे, तसेच बचाव दलाच्याही संपर्कात आहे असे त्यांनी ट्विट करून सांगितले आहे. या दुर्घटनेबाबत तातडीने चौकशी करण्यास सांगितले असून, या कठीण प्रसंगी मी मृतांच्या नातेवाईकांसोबत आहे, असेही ते म्हटले आहेत.

18:21 May 22

पाकिस्तान विमान दुर्घटना; शंभरहून अधिक ठार..

पाकिस्तानमध्ये विमान कोसळले..

या विमानात असलेले दोघे या क्रॅशमधून बचावल्याची माहिती पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिली आहे. या अधिकाऱ्यांनी आपले नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. यापूर्वी कराचीच्या मेयरांनी असे जाहीर केले होते, की विमानात असलेल्या सर्व १०७ जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. 

16:06 May 22

पाकिस्तानमध्ये विमान कोसळले..

इस्लामाबाद -पाकिस्तानच्या कराचीजवळ एक विमान कोसळ्याची घटना घडली आहे. यामध्ये शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. पीआयए एअरबस ए३२० या प्रवासी विमानामध्ये एकूण ९८ लोक होते, अशी माहिती मिळाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान लाहोरहून कराचीला चालले होते. कराचीच्या मालिरमध्ये मॉडेल कॉलनीजवळ असलेल्या जिन्ना गार्डन परिसरात हे विमान कोसळले. विमानतळावर उतरण्याच्या एक मिनिट आधी हे विमान क्रॅश झाल्याची माहिती एका स्थानिक वृत्तसंस्थेने दिली आहे.

रहिवासी भागात हे विमान कोसळल्यामुळे कित्येक इमारतींचे नुकसान झाले आहे. क्रॅशची माहिती मिळताच पाकिस्तानी लष्कराची दोन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. सध्या युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे.

या घटनेनंतर पाकिस्तानच्या आरोग्य आणि जनकल्याण मंत्र्यांनी सर्व मोठ्या रुग्णालयांमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. पाकिस्तानमधील एका वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

Last Updated : May 22, 2020, 9:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details