पाकिस्तानने लष्करप्रमुखांचा कार्यकाळ ३ वर्षांनी वाढवला
पाकिस्तानच्या डॉन वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, लष्करप्रमुख क्वामार जावेद बाजवा यांची तीन वर्षांसाठी फेरनियुक्ती झाली आहे. त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याच्या तारखेपासून पुढील तीन वर्षांसाठी त्यांना पदावर कायम करण्यात आले आहे.
इस्लामाबाद - पाकिस्तानचे लष्करप्रमुख क्वामार जावेद बाजवा यांचा कार्यकाळ तीन वर्षांनी वाढवण्यात आला आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयातून याबाबतची माहिती प्रसारित करण्यात आली आहे. या कार्यकाळ वाढीला पंतप्रधान इम्रान खान यांचा 'ग्रीन सिग्नल' असून त्यांच्या सहीनेच निवेदन जारी करण्यात आले आहे.
पाकिस्तानच्या डॉन वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, बाजवा यांची तीन वर्षांसाठी फेरनियुक्ती झाली आहे. त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याच्या तारखेपासून पुढील तीन वर्षांसाठी त्यांना पदावर कायम करण्यात आले आहे. प्रादेशिक सुरक्षा व्यवस्था कायम राखण्याच्या दृष्टीने बाजवांची फेरनियुक्ती केली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम हटवल्यानंतर पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. याविषयी पाकिस्तानचे पंतप्रधान जागतिक स्तरावर अनेक ठिकाणी समर्थन मिळवण्यासाठी फिरत आहेत. मात्र, त्यांना कोणत्याही देशाचे समर्थन मिळताना दिसत नाही. यातच बाजवा यांनाच पुन्हा लष्करप्रमुख म्हणून कायम केल्याने याविषयी उलट-सुलट चर्चा होण्याची शक्यता आहे.
लष्करप्रमुख क्वामार जावेद बाजवा यांची नियुक्ती नवाज शरीफ पंतप्रधान असताना नोव्हेंबर २०१६ मध्ये करण्यात आली होती. ५८ वर्षीय बाजवा यांनी लष्करामध्ये विविध महत्त्वाची पदे भूषवली आहेत. त्यांनी कमांडर ऑफ रावळपिंडी लष्करी दल, जनरल इन्सपॅक्टर तसेच ब्रिगेडियर म्हणून एक्स लष्कर प्रमुख, फॉर्मेशन कमांडर अशी पदे भूषवली आहेत.