काबूल - अफगाणिस्तानात तालिबानी राजवटीच्या नव्या अध्यायाला सुरुवात होत आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी बोलावल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला. तालिबानी दहशतवाद्यांच्या भीतीनं संपूर्ण देशात दहशतीचं वातावरण आहे. मात्र, यौद्धा अहमद मसूद यांच्या नेतृत्वातील नॉर्दन अलायन्सचा बालेकिल्ला असलेला पंजशीर प्रांत अद्यापही तालिबान्यांना शरण गेलेला नाही. दहशतगर्द तालिबान्यांना भीक न घालणारे अहमद मसूद आणि त्यांची 'नॉर्दन अलायन्स' काय आहे, हे जाणून घ्या...
पंजशीर प्रांत अफगाणिस्तानच्या 34 प्रांतापैकी एक आहे. काबूलपासून 150 किलोमीटर अंतरावर हा प्रांत आहे. या प्रांताचे रक्षण पंजशीरचे शेर अशी ओळख असलेले अहमद शाह मसूद यांच्या नेतृत्वात नॉर्दन अलायन्सने केले. तर आता अहमद शाह मसूद यांचे पुत्र अहमद मसूद हे तालिबान्याच्या विरोधात उभे ठाकले आहेत. आपल्या वडिलांचा तालिबानविरोधी प्रतिकाराचा वारसा ते पुढे नेत आहेत. मुकाबला करू, पण शरण जाणार नाही, असे अहमद मसूद यांनी म्हटलं आहे. तालिबान्यांच्या विरोधात 1996 मध्ये अहमद शाह मसूद यांनीच नॉर्दन अलायन्सची पायाभरणी केली होती. नॉर्दर्न अलायन्स हा मजबूत सैनिकी गट आहे. याच्यासमोर तालिबानी टिकाव धरत नाहीत.
काय आहे नॉर्दर्न अलायन्स?
नॉर्दर्न अलायन्स ही 1996 पासून काबूलमध्ये तालिबान राजवटीला विरोध करणाऱ्या बंडखोर गटांची युती होती. अफगाणिस्तान नॉर्दर्न अलायन्स (Afghan Northern Allaince) याला औपचारिकपणे अफगाणिस्तानच्या मुक्तीसाठी संयुक्त इस्लामी मोर्चा (United Islamic Front for the Salvation of Afghanistan) असे म्हटलं जात. हा एक सैनिकी मोर्चा आहे. 1996 मध्ये काबूलवर तालिबान कट्टरपंथी गटाने ताबा मिळवल्यानंतर त्यांचा विरोध करण्यासाठी तयार करण्यात आला होता. याची स्थापना अफगाणिस्तान सरकारचे अध्यक्ष बुरहानुद्दीन रब्बानी आणि माजी संरक्षण मंत्री अहमद शाह मसूद यांनी केली होती.
सुरुवातीला यात मुख्यतः ताजिक समुदायाचे लोक होते. परंतु 2000 पर्यंत इतर वांशिक गट देखील त्यात सामील झाले. या नेत्यांमध्ये उझ्बेक समुदायाचे अब्दुल रशीद दोस्तुम, पश्तून समाजाचे अब्दुल कादीर, हजारा समाजाचे मोहम्मद मोहाकिक आणि सय्यद हुसेन अनवारी यांचा समावेश होता.