बीजिंग - चीनमधील कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या बळींच्या संख्येने दोनशेचा टप्पा ओलांडला आहे. तब्बल दहा हजारांच्या आसपास लोकांना या विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती समोर येत आहे. परिस्थितीचे गांभीर्य पाहता, जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे.
चीनच्या हुबेई प्रांतामध्ये आतापर्यंत ५,८०६ जणांना संसर्ग झाला आहे, तर २०४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर चीनच्या एकूण ३१ प्रांतांमध्ये मिळून ९,६९२ नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती चीनच्या आरोग्य प्रशासनाने दिली आहे. चीनबाहेर साधारणपणे २० देशांमध्ये कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. यामध्ये भारताचाही समावेश आहे.
WHO ने जाहीर केली जागतिक आरोग्य आणीबाणी..
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना विषाणूला जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. संघटनेचे प्रमुख टेड्रोस यांनी हे जाहीर करताना म्हटले, की ज्या देशांची आरोग्य व्यवस्था कमकुवत आहे, अशा देशांमध्ये कोरोना विषाणू पसरणे ही आमच्यासाठी काळजीची बाब आहे.
यावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी प्रतिक्रिया देत म्हटले, की चीन सरकार या विषाणूविरोधात लढण्यासाठी संपूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहे. आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमनाने सांगितलेल्या उपायांच्याही पुढे जाऊन आम्ही कार्य करत आहोत. चीन सरकारने वेळीच याबाबतची जबाबदारी स्वीकारत कोरोनाबाबतची सर्व माहिती जगापुढे सादर केली होती, हेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कोरोनाविरूद्धची ही लढाई चीन नक्कीच जिंकेल, असा विश्वास हुआ यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा : 'असा' करा 'कोरोना'पासून तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा बचाव