बीजींग -गेल्या २४ तासात कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये आणखी ४६ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण २५९ जणांचा बळी या विषाणूमुळे गेला आहे. तसेच चीनमध्ये १२ हजार लोकांना या विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे.
यामधील ४५ नागरिक हे हुबेई प्रांतामध्ये होते, तर हुबेई प्रांताबाहेर एकाचा मृत्यू झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य पाहता, जागतिक आरोग्य संघटनेने काल (शुक्रवार) जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली होती. चीनने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना प्रवासापासून बंदी केली आहे. त्यामुळे जवळपास ५३ दशलक्ष लोकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो आहे. काही मुख्य शहरांमधील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, केवळ या लोकांसाठी खाद्यपदार्थ नेणाऱ्या ट्रकांना वाहतूकीस परवानगी देण्यात आली आहे.