बैरूत - सीरियाच्या सरकारकडून होत असलेले हवाई हल्ले आणि गोळीबार आणि बॉम्बवर्षावात 23 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात 30 जण जखमी झाले आहेत. यापैकी काही जण गंभीर स्थितीत आहेत. येथील मानवाधिकार संघटनेने ही माहिती दिली.
जिहादींच्या कब्ज्यात असलेल्या इदलिब या भागात काही महिन्यापूर्वी 'युद्धबंदी समझोता' झाला होता. यानंतर या भाग सुरक्षित झाला आहे, असे मानण्यात येत होते. मात्र, सध्या येथे भीषण बॉम्बवर्षाव सुरू आहे.
सीरियन ऑब्झर्व्हेट्री फॉर ह्यूमन राइट्स या संस्थेने मंगळवारी झालेल्या या हल्ल्यांमध्ये 23 जण ठार तर 30 जण जखमी झाल्याचे सांगितले आहे. यापैकी काही जण गंभीर जखमी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, सरकारकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यात तलमनास गावातील एकाच कुटुंबातील के सात सदस्य मारले गेले. तर बदामा क्षेत्रात आणखी चार जण मारले गेले. यामध्ये ह्वाइट हेल्मेट्स रेस्क्यू ऑर्गनायझेशनच्या एका सदस्याची तीन मुली आणि पत्नी यांचा समावेश आहे. अन्वर असे या सदस्याचे नाव आहे.
ह्वाइट हेल्मेट्सने आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडियो पोस्ट केला आहे. यामध्ये इमारतीच्या ढिगाऱ्याखालून त्यांचा सदस्य आपल्या कुटुंबीयांचे मृतदेह बाहेर काढताना दिसत आहे. तर, अशाच प्रकारे झालेल्या हल्ल्यात मासरान या गावातील सहा नागरिक मारले गेले.