हैदराबाद - कोविड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी हाताची स्वछता, स्वच्छ पाणी आणि सार्वजनिक स्वच्छतेबरोबरच सामाजिक अंतर राखणे यांसारखे पर्यायच जीव वाचविण्यासाठी आणि आरोग्य राखण्यासाठी उपयोगी ठरणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) नुकत्याच प्रकाशित केलेल्या निवेदनात म्हटले आहे. पाणी आणि साबणाने हात स्वच्छ धुण्याने विषाणू नष्ट होतो हे जर खरे असले तरी पुरेशा प्रमाणात प्रवाही पाणी उपलब्ध असणे आवश्यक असल्याचे निवेदनात स्पष्ट केले आहे.
यासाठी प्रादेशिक, राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर योजना आखताना पाणी, शौचालये आणि परिसरातील स्वच्छता राखण्याला प्राधान्य दिले पाहिजे असे निवेदनात म्हटले आहे.
जे धोरणकर्ते किंवा नेते कोविड-१९चा प्रसार रोखण्यासाठी पाणी, शौचालये आणि परिसर स्वच्छतेचे महत्त्व जाणतात आंतरराष्ट्रीय पातळीवरील सहकार्य आणि मदतीने कृती करतील तेच नागरिकांचे जीव वाचवू शकतील यावर निवेदनात जोर देण्यात आला आहे.
या निवेदनावर एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अध्यक्षांसह जागतिक पातळीवरील अनेक नेते आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रमुखांनी सही केली आहे.
डब्ल्यूएचओने सर्व प्रादेशिक, राष्ट्रीय आणि जागतिक नेत्यांना खालील बाबींची पूर्तता करण्याचे आवाहन केले आहे:
सर्वांना पाणी, शौचालये आणि स्वच्छेतेची साधने उपलब्ध करून देणे. सर्वांना एकत्र घेत असमानता दूर करणे. कोविड-१९ची बाधा होऊ शकते किंवा ज्या लोकांना याचा सर्वाधिक धोका संभवतो त्या लोकांची काळजी घेणे. यामध्ये वृद्ध, अपंग, स्त्रिया आणि मुली यांच्याबरोबरच बेकायदेशीर वसाहती करून राहणारे, निर्वासित छावण्यांमध्ये राहणारे, तुरुंग किंवा डिटेन्शन केंद्रात राहणारे आणि बेघर लोक यांचा समावेश होतो. त्याचबरोबर कोविड-१९ला आळा घालण्यासाठी ज्या उपाययोजना आखल्या आहेत त्यामुळे ज्यांचे जीवनमान प्रभावित झाले आहे अशा लोकांबरोबरच कोणत्याही मोबदल्याविना दुसऱ्यांची काळजी घेण्यासाठी राबणाऱ्या महिलांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. या सर्व उपाययोजना फक्त कोविड १९चा प्रसार रोखण्यातच महत्त्वाच्या आहेत असे नाहीतर स्वच्छ पाण्याच्या अभावाने किंवा शौचालये आणि इतर स्वच्छतेच्या साधनांअभावी जे रोग पसरतात त्यांवर आळा घालण्यात देखील महत्त्वाच्या ठरणार आहेत.
पाणी आणि स्वच्छता सेवा सुधारण्यासाठी सार्वजनिक, खाजगी क्षेत्रातील भागधारक तसेच देणगीदार आणि समाजातील सर्वांना एकत्र घेऊन सर्वांशी समन्वय ठेवून काम करूनच कोविड-१९ पासून सर्वांचे संरक्षण करणे सोपे होणार आहे. सर्वांशी समन्वय ठेवूनच आरोग्य सुविधांमध्ये सार्वजनिक किंवा खाजगी व्यावसायिक इमारती आणि सार्वजनिक परिवहन सुविधांच्या ठिकाणी 'हँडवॉशिंग' सुविधा तातडीने उपलब्ध करणे शक्य होणार आहे. पाणी आणि सर्वांसाठी स्वच्छता हे धोरण प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार्य आणि अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
लोकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि राष्ट्रीय आरोग्य यंत्रणेला साथ देण्यासाठी शाश्वत पाणी आणि स्वछता सुविधा सुनिश्चित करणे गरजेचे आहे. पाणी, शौचालये किंवा स्वच्छेतेच्या साधनांचा पुरवठा कोणत्याही परिस्थितीत जागतिक पातळीवर कायम ठेवणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर या सर्व सुविधा सुरळीत सुरु ठेवण्यासाठी या क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांना संरक्षण देणे देखील तितकेच गरजेचे आहे.
या संकटाचा सामना करण्यासाठी देशांना लागणारा निधी उपलब्ध करून देण्याला प्राधान्य दिले पाहिजे. त्याचबरोबर तातडीच्या पातळीवर देण्यात आलेली आर्थिक मदत दीर्घकालीन समाधानासाठी असणे आवश्यक आहे. पाणी आणि स्वच्छतेची साधने सर्वाना वाजवी दरात उपलब्ध व्हावीत यासाठी आणि सेवा पुरवठादारांना आधार देण्यासाठी आणि अतिरिक्त निधीची आवश्यकता भासू शकते. त्याची दाखल घेतली गेली पाहिजे.
पारदर्शक पद्धतीने अचूक माहिती पोचविणे, वैज्ञानिक सल्ल्यावर आधारित सातत्यपूर्ण आणि तर्कशुद्ध माहिती उपलब्ध करून देणे यासारखी कृती केल्यास लोकांना त्याचे महत्त्व समजून येण्यास मदत होईल आणि त्यानुसार ते त्याचे नियोजन करू शकतील.
कोविड-१९ ही देशांसमोरील पहिली किंवा शेवटची महामारी नाही. भविष्यातील संकटांवर मात करण्यासाठी आपण आता कोणती प्रतिबंधात्मक कृती करतो यावर बरेच अवलंबून आहे. तसेच परिस्थिती सामान्य असताना राबविलेली धोरणे, संस्थात्मक उभारणी आणि त्यांच्या क्षमतांचा केलेला विकास भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी उपयोगी पडणार आहे असे देखील निवेदनात म्हटले आहे.