संयुक्त राष्ट्रे - जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची तयारी केली आहे. २४ तासांमध्ये मसूदबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल. 'मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे,' अशी मागणी भारताने सुरक्षा परिषदेकडे केली होती. फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिकेने पुढाकार घेत हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांमध्ये मांडला होता. आता तरी या प्रयत्नाला यश येईल का, याकडे संपूर्ण देशाचे आणि जगाचेही लक्ष लागले आहे.
हा प्रस्ताव २७ फेब्रुवारीला चौथ्यांदा दाखल करण्यात आला. यापूर्वी प्रत्येक वेळी चीनने व्हिटोचा अधिकार वापरून मसूद अझहर आणि पाकिस्तानला वाचवले होते. यामुळे चीनच्या भूमिकेवर जगभरातून टीका होत आहे. त्यानंतर तो 'नो-ऑब्जेक्शन'साठी १० कार्यालयीन दिवसांच्या कालावधीसाठी ठेवण्यात आला होता. ही मुदत आज (बुधवार) दुपारी ३ वाजता संपत आहे. आता चीन पुन्हा एकदा नकाराधिकाराचा वापर करणार काय, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
'मसूद अझहर आंतराराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या सर्व निकषांना पात्र आहे. मंजूरी समितीसह आम्ही दहशतावाद्यांची यादी अद्ययावत आणि अचूक करण्यासाठी प्रयत्नशील आहोत,' असे सूचक वक्तव्य अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटचे उपप्रवक्ते रॉबर्ट पॅलाडिनो यांनी केले होते. मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यास हा भारताचा मोठा विजय ठरणार आहे. तसेच, दहशतवादा खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला दणका बसणार आहे.