न्यूयॉर्क - २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याच्या भारताच्या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने २०१५ साली मान्यता दिली. त्यानंतर गेल्या ५ वर्षांपासून जगभरात २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जात आहे. संयुक्त राष्ट्रसंघ ही योगाच्या उल्लेखनीय वाढीची विशेष जागा आहे असे संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरूद्दीन यांनी म्हटले आहे. पाचव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या प्रसंगी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत ते बोलत होते.
अकबरूद्दीन पुढे म्हणाले, आमच्या आयुष्यातील संयुक्त राष्ट्रसंघ ही योगाच्या उल्लेखनीय वाढीची विशेष जागा आहे. प्राचीन योगाचा आजच्या जागतिक स्तरावर याच आमसभेच्या सभागृहामध्ये रूपांतरीत झाला. आज जगामध्ये योगाबद्दल वाढलेली लोकप्रियता आणि जगाने योगाचा केलेला स्वीकार हे योगामुळे मिळत असलेल्या फायद्याची साक्ष देत आहेत, असेही त्यांनी सांगितले.