नवी दिल्ली -एखादं काम करत असताना तुमच्या लहान मुलांनी त्यात लुडबूड करणं ही एक सामान्य बाब आहे. मात्र, तुम्ही वृत्तनिवेदिका आहात आणि लाईव्ह टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज सांगत असतानाच तुमचा छोटा मुलगा येऊन आई-आई करून गळ्यात पडण्याचा उपद्व्याप कॅमेऱ्यासमोरच करत असेल तर...? अशा वेळेस मुलावर डोळे वटारावेत की त्याचा प्रेमाने गालगुच्चा घ्यावा हे आईला कळणार नाही. असाच काहीसा प्रकार एमएसएनसीबीच्या वृत्तनिवेदिकेसोबत झाला.
तर, अमेरिकेतील ही वृत्तनिवेदिका सिरिया-तुर्की बॉम्बस्फोटाची वृत्तांकन करत होती. संपूर्ण जग ही अत्यंत गंभीर लाईव्ह न्यूज पहात असतानाच अचानक निवेदिकेच्या मुलाने येऊन लडिवाळपणे आईच्या गळ्यात हात टाकला. त्यामुळे गंभीर बातमी सांगणाऱ्या निवेदिकेलाही हसू आवरले नाही. 'एक मिनिट माझा मुलगा येथे आला आहे. लाईव्ह टिव्हीवर' असं म्हणत तिनं परिस्थिती सांभाळून घेतली. मात्र, यामुळे सगळ्या जगाला बॉम्ब स्फोटाच्या गंभीर बातमीसोबतच एक ताण हलका करणारी बातमीही पाहायला मिळाली. कर्टनी क्यूब असे या वृत्तनिवेदिकेचे नाव आहे.