वॉशिंग्टन डी.सी -अमेरिकेमध्ये 3 नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांनी मतदारांना प्रभावित करण्यासाठी प्रचार मोहीम जोरदार सुरू केली आहे. ट्रम्प यांनी बायडन यांच्यावर मिश्कील टीका केली आहे. जर बायडन निवडणूक जिंकले तर, कदाचित मला देशही सोडावा लागेल, असे ट्रम्प म्हणाले.
...तर मला अमेरिका सोडावी लागेल - ट्रम्प - डोनाल्ड ट्रम्प लेटेस्ट न्यूज
डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडन यांच्यावर पुन्हा एकादा निशाणा साधला आहे. जो बायडेन हे अमेरिका राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात वाईट उमेदवार असल्याचा पुनरुच्चार ट्रम्प यांनी केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी काल (शुक्रवारी) जॉर्जियातील मेकन येथे प्रचारसभा घेतली. त्यावेळी त्यांनी बायडन यांना शालजोडे मारले. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात वाईट उमेदवार माझ्या विरोधात रिंगणात आहे. त्यामुळे माझ्यावर जास्त दडपण आहे. अशा व्यक्तीकडून मी हारलो तर, मी कसे काम करू शकेल? याची कल्पनाही मला करवत नाही. त्यामुळेच बायडन जिंकले तर, कदाचित मला देश सोडावा लागेल, असे ट्रम्प म्हणाले.
राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्या अगोदर ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याला बायडन यांनी ट्विट करून उत्तर दिले. द अँटी-ट्रम्प रिपब्लिकन ग्रुप व द लिंकन प्रोजेक्ट यांनी ट्रम्प यांच्या भाषणाचा व्हिडीओ शेअर करत त्याला 'प्रॉमिस?' असे कॅप्शन दिले आहे.