वॉशिंग्टन - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. २२ जुलैला ही भेट होणार आहे. दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध सुधारण्याबाबत या दोन देशांच्या प्रमुखांमध्ये चर्चा होऊ शकते. डोनाल्ड ट्रम्प आणि इम्रान खान या दोघांची भेट होणार असल्यासंदर्भातले एक पत्र व्हाईट हाऊसतर्फे जारी करण्यात आले आहे.
दोन्ही देशांमधली शांतता, स्थैर्य आणि आर्थिक मुद्द्यांवर या भेटीत चर्चा होणार आहे. तसेच, दहशतवादाचा बीमोड करणे, सुरक्षा, व्यापार या विषयांवरही चर्चा होणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून त्यांचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनीही या भेटीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.