वॉशिंग्टन डी.सी -जगभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता सर्वच देशांनी कोरोनाची धास्ती घेतली आहे. कोरोनाचे संक्रमण संपूर्ण जगात दिवसेंदिवस वाढतच चालले असून जागतिक स्तरावर गेल्या 24 तासात 2 लाख 76 हजार 862 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 6 हजार 96 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
जागतिक कोरोना रुग्णांची आकडेवारी जगात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2 कोटी 61 लाख 77 हजार 603 वर पोहचली आहे. तर 8 लाख 67 हजार 347 जणांचा बळी गेला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, एकूण 1 कोटी 84 लाख 42 हजार 307 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोना विषाणूच्या प्रसाराची सुरवात चीनमधून झाली होती. मात्र, सध्या चीनने कोरोनावर नियंत्रण मिळवले असून तिथे इतर देशांच्या तुलनेत सर्वांत कमी 4 हजार 634 मृत्यू झाले आहेत. कोरोनाचा सर्वांत जास्त फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत 1 लाख 89 हजार 964 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 62 लाख 90 हजार 737 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. अमेरिकेपाठोपाठ ब्राझिल, भारत, रशिया, पेरू या देशांचा समावेश आहे.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी जगभरात सुरू असलेली महामारी दोन वर्षात संपेल, असे म्हटले आहे. इतिहासातही महामारी आणि संसर्गजन्य रोगांमुळे आर्थिक आणि सामाजिक परिणाम झाले आहेत. यावेळीही तसेच घडणार असल्याचे त्यांनी सूचित केले.