महाराष्ट्र

maharashtra

मी काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करू शकतो, तेथे मोठी धार्मिक गुंतागुंत आहे - ट्रम्प

By

Published : Aug 21, 2019, 2:33 PM IST

Updated : Aug 21, 2019, 3:55 PM IST

ट्रम्प यांनी सोमवारी पाक पंतप्रधान इम्रान खान आणि भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरती संभाषण केल्याचे सांगितले आहे. काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करून तेथे शांतता निर्माण करण्यास खूप आनंद वाटेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

ट्रम्प करणार मध्यस्थी?

वॉशिंग्टन -अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी पुन्हा एकदा काश्मीरप्रश्नी भारत-पाकिस्तानदरम्यान मध्यस्थी करण्याचे वक्तव्य केले आहे. काश्मीर प्रश्न हा अत्यंत गुंतागुंतीचा आहे. सध्या तेथील स्थिती 'स्फोटक' बनली आहे. त्यांनी सोमवारी पाक पंतप्रधान इम्रान खान आणि भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरती संभाषण केल्याचे सांगितले आहे. काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करून तेथे शांतता निर्माण करण्यास खूप आनंद वाटेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

'काश्मीरचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा आहे. तेथे हिंदू आणि मुस्लीम वास्तव्यास आहेत. ते एकमेकांसह चांगले आहेत, असे मला वाटत नाही. हे अनेक दशकांपासून चालू आहे,' असे ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले. 'मध्यस्थी करण्यासाठी मी शक्य ते सर्व प्रयत्न करेन. मोकळेपणाने सांगायचे तर, तेथील दोन देशांचे एकमेकांशी चांगले संबंध नाहीत. ते फार काळ शांत राहू शकत नाहीत. ही अत्यंत स्फोटक परिस्थिती आहे,' असे ते म्हणाले. भारत आणि पाकिस्तानदरम्यानचे संबंध बिघडण्यामागे धर्म हे एक महत्त्वाचे कारण असल्याचेही वक्तव्य ट्रम्प यांनी केले आहे.

दरम्यान, इम्रान खान यांनी ट्रम्प यांच्याशी फोनवर संवाद साधत ट्रम्प यांना या परिस्थितीवर आणि काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्याची विनंती केली.

'मी पंतप्रधान खान आणि पंतप्रधान मोदींशी संवाद साधला आहे. ते दोघेही माझे चांगले मित्र आहेत आणि चांगले लोकही आहेत. माझे त्या दोघांशीही चांगले संबंध आहेत,' असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. काश्मीरला विशेष दर्जा देणारे आर्टिकल ३७० रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयानंतर ट्रम्प यांचे हे पहिलेच वक्तव्य आहे.

भारताने हे पाऊल उचलल्यानंतर बिथरलेल्या पाकने परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांना मदत मागण्यासाठी चीनकडे पाठवले होते. चीनने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकची बाजू घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तथापि, संयुक्त राष्ट्रसंघाचे स्थायी सदस्यत्व असलेल्या पाचपैकी ४ सदस्यांनी भारताच्या निर्णयावर पाकला पाठिंबा देण्याचे नाकारले.

भारताने पुन्हा एकदा जम्मू-काश्मीर हा संपूर्णपणे आपला अंतर्गत विषय असल्याचे म्हटले आहे. तसेच, देशाने उचललेली पावले त्या ठिकाणच्या चांगल्या भविष्यासाठी आणि प्रदेशाच्या चांगल्या विकासासाठी असल्याचेही म्हटले आहे.

Last Updated : Aug 21, 2019, 3:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details