वॉशिंग्टन डी. सी. - अमेरिकेत ४५व्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान पार पडले. त्यानंतर आता मजमोजणी सुरू असून निवडणूकीचे चित्र स्पष्ट होण्यास सुरुवात झाली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांना आत्तापर्यंत २६४ इलेक्टोरल मते मिळाली आहेत. विजयासाठी त्यांना आता केवळ सहा मतांची गरज आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांना आतापर्यंत २१४ इलोक्टोरल मते मिळाली आहेत. त्यामुळे ट्रम्प यांच्या विजयाच्या आशा मावळतीला लागल्याचे दिसत आहे. पराभव समोर दिसताच ट्रम्प यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. निवडणूक प्रक्रियेवरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
7:00 AM
ट्रम्प यांनी तीन राज्यांमध्ये खटले दाखल केले..
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कॅम्पेनने बुधवारी पेन्सिल्व्हेनिया, मिशिगन आणि जॉर्जिया या तीन राज्यांमध्ये खटले दाखल केले आहेत. डेप्युटी कॅम्पेन मॅनेजर जस्टिन क्लार्क यांनी याबाबत माहिती दिली. यापूर्वी त्यांनी पेन्सिल्व्हेनिया आणि नेव्हाडामधील मतदान मोजणी प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासंबंधीची याचिकाही दाखल केली आहे. तसेच, पेन्सिल्व्हेनियामध्ये मतदानाच्या दिवसानंतर तीन दिवसांपर्यंत आलेले बॅलोट मतमोजणीसाठी ग्राह्य धरण्यात यावे की नाही याबाबत सुरू असलेल्या खटल्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्नही ट्रम्प कॅम्पेन करत असल्याचे क्लार्क यांनी सांगितले.
6:45 AM
फिलाडेल्फियामध्ये आंदोलन..
बुधवारी रात्री फिलाडेल्फियाच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात आंदोलकांनी गर्दी केली होती. निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या प्रत्येक मताची मोजणी करा, अशी मागणी हे आंदोलक करत होते. 'काऊंट एव्हरी व्होट' असे फलक या आंदोलकांकडे होते.
6:30 AM
नेव्हाडा ठरणार किंगमेकर..
सध्या डोनाल्ड ट्रम्प पेन्सिल्व्हेनिया, नॉर्थ कॅरोलिना, अलास्का आणि जॉर्जियामध्ये आघाडीवर आहेत. या चारही राज्यांमध्ये जर ट्रम्प यांचा विजय झाला, तर त्यांना एकूण ५४ इलेक्टोरल व्होट्स मिळतील. त्यानंतर त्यांच्या एकूण इलेक्टोरल व्होट्सची संख्या २६८ होणार आहे. दुसरीकडे, बायडेन यांच्याकडे आताच २६४ इलेक्टोरल व्होट्स आहेत. विजयासाठी त्यांना आणखी केवळ सहा इलेक्टोरल व्होट्सची गरज आहे. नेव्हाडामध्ये सहा इलेक्टोरल व्होट्स आहेत, आणि तिथे बायडेन आघाडीवर आहेत. त्यामुळे या निवडणुकीत नेव्हाडा किंगमेकर ठरणार आहे.
- 6:00 AM - नेव्हाडामध्ये बायडेन आघाडीवर; तर ट्रम्प पेन्सिल्व्हेनियामध्ये पुढे..
- 4:00 AM अनेक राज्यात गुप्तपणे मतदान केल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे..
- मिशिगन राज्यात जो बायडेन यांची विजयी घौडदौड सुरूच, ट्रम्प पिछाडीवर..