वॉशिंग्टन- कोरोना वरील लस शोधण्यात यश आले आणि आणि ती विकसित केली व सर्वत्र पोहोचवली तरी कोरोना विषाणू काही वर्षे कायम राहील. एचआयव्ही, चिकन पॉक्स,मिसेल यासारखे विषाणू मुळे होणारे रोग कायम आहेत, त्याप्रमाणे कोरोना विषाणूमुळे होणारा आजार काही वर्षे कायम राहील, असे द वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.
कोरोना विषाणू बराच काळ टिकून राहणे, हे अमेरिकेसाठी आव्हानात्मक असणार आहे. या विषाणूजन्य आजाराबद्दल अनेक अनिश्चितता पहायला मिळतात कोरोना विषाणूचे सातत्याने टिकून राहणे याचा अभ्यास करणे हे आपल्या पुढील आव्हान असेल असे तज्ज्ञांनी म्हटले.
चार संसर्गजन्य विषाणूमुळे सर्दीचा आजार होतो. त्यामध्ये कोव्हिड-19 ची भर पडली आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये जागतिक लोकसंख्येच्या तुलनेत बहुतांश लोकांना कोरोनाचा संसर्ग झालेला नाही.
शिकागो विद्यापीठाचे साथरोग तज्ञ आणि जीवशास्त्रज्ञ साराह कोबी यांनी आपण कोरोना संसर्गाच्या काळात सुरक्षित राहू शकतो का हा प्रश्न उपस्थित केला आहे. कोरोना सारख्या संसर्गजन्य आजाराची लढताना शाश्वत प्रयत्न आणि राजकीय इच्छाशक्तीची गरज असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
सध्या जगातील अनेक देश आर्थिकदृष्ट्या सावरण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कोरोनाशी लढताना छोट्या कालावधीसाठी विचार न करता दीर्घकालीन धोरण ठरवण्याची गरज असल्याचे आजार नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राचे माजी संचालक टॉम फ्रायडन यांनी म्हटले.
कोरोना संसर्गाच्या काळात लोक कोणता एक उपाय करावा, असे विचारत आहेत. मात्र कोरोना सारख्या विषाणूशी लढताना सर्वसमावेशक उपायांची गरज आहे. अमेरिकेसह अनेक देश कोरोनावर तातडीने लस शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, लस शोधण्यात यश आले तरी ते औषध खूप महाग असेल. लाखो लोकांच्या जीवनाचा प्रश्न असल्याने त्याची मागणी जास्त असेल.
कॅलिफोर्निया विद्यापीठाचे आयरव्हीन साथरोगतज्ञ नोयमेर यांनी येत्या काही काळानंतर कोरोना विषाणूची लक्षणं सौम्य होत जातील असे म्हटले.
लसीकरणासाठी योजना आधीपासूनच दहा वर्षांच्या कालावधी साठी आहे, असे फेडरल सरकारच्या लसीकरण संशोधन केंद्राचे उपसंचालक बार्नी ग्रॅहॅम म्हणाले. आपण येणाऱ्या हिवाळी ऋतुला सामोरे जाण्यासाठी तयार आहोत का, 2021-22 या वर्षासाठी तयारी आहे असा असा विचार न करता वेळोवेळी निर्माण होणाऱ्या हंगामी विषाणूजन्य आजारांसाठी आपण नियोजन करणे गरजेचे आहे, असे, ग्रॅहम म्हणाले.
द वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार जरी लस शोधण्यात यश आले तरी जागतिक मागणी खूप मोठी असणार आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने सहकार्याचे धोरण अवलंबणे गरजेचे आहे. कोरोना विषाणूमुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याने प्रत्येकाला लसीची गरज आहे, असे होवार्ड कोह यांनी म्हटले.